केवळ ३१ मुला-मुलींचा शोध

By Admin | Updated: August 11, 2015 02:17 IST2015-08-11T02:17:57+5:302015-08-11T02:17:57+5:30

बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने सुरू

Only 31 boys and girls search | केवळ ३१ मुला-मुलींचा शोध

केवळ ३१ मुला-मुलींचा शोध

आॅपरेशन मुस्कान : २६ बालकांचा अद्याप थांगपत्ता नाही
गोंदिया : बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने सुरू केलेल्या ‘आॅपरेशन मुस्कान’ प्रकल्पात पोलिसांना जुलै महिन्यात ३१ बालकांना शोधून काढण्यात यश आले, परंतु २६ बालकांचा अजूनही थांगपत्ता नाही. त्यामुळे आॅपरेशन मुस्कान सध्यातरी पूर्णपणे यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही.
जिल्हा पोलिसांनी ‘आॅपरेशन मुस्कान’ अभियान राबवून १ ते ३१ जुलै या एक महिन्यात बेपत्ता असलेल्या ३१ बालकांचा शोध लावला. यातील ७ मुले व १६ मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. ७ मुले व एका मुलीला बालक समितीसमोर सादर करण्यात आले. अशा एकूण ३१ बालकांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
हरविलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे ही मोहीम राबविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात सन २०१० पासून ३० जून २०१५ या काळात बेपत्ता झालेले किंवा अपहरण झालेल्या अल्पवयीन मुला-मुलींना त्यातून शोध घेण्यात आला. या काळात २४७ मुले व ५११ मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी काहींचा शोध लागला तर काही स्वत:हून घरी परतले आहेत. ८ मुले व १८ मुली अजूनही बेपत्ता आहेत.
सन २०१० ते ३० जून २०१५ या काळात जिल्ह्यातील २४८ मुले तर ५०७ मुली बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी २३९ मुले व ४९३ मुली पोलिसांना मिळाल्या आहेत. या आॅपरेशन मुस्कान अभियानासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व दोन कर्मचारी लावले होते. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानके, रूग्णालय, उद्याने, चौक, रेल्वेस्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ती किंवा भीक मागणाऱ्या मुलांशी संपर्क अभियान राबविले आहे. त्या बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेला स्वयंसेवी संस्थांची मदत मिळाली नाही, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)

वाममार्गात लावले जाते मुलांना
४मुलांच्या हातून भीक मागविण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्या हातून भीक मागविणे, काहींना इतर वाममार्गाकडे वळविले जाते.
४मुलींना देहविक्रीच्या व्यवसायात लावण्यासाठी त्यांचे अपहरण केले जाते.
४या प्रकाराला आळा घालण्यासाठी १८ वर्षाखालील बेपत्ता किंवा अपहरणातील बालकांना शोधून त्यांच्या आईवडीलांच्या हवाली करण्यासाठी आॅपरेशन मुस्कान ही मोहीम राबविण्यात आली. परंतु अजूनही २६ बालकांना शोधण्यात पोलिसांना यश आले नाही.

सामाजिक संघटना
अनुदान लाटण्यापुरत्या
४गोंदियात शासनाचे अनुदान लाटण्यासाठी समाजसेवेचा देखावा करणाऱ्या संस्था अनेक आहेत. तर काही संघटना केवळ काहीतरी करीत असल्याचा देखावा करून प्रसिद्धी मिळविण्यासाठी हपापलेल्या दिसतात. मात्र आॅपरेशन मुस्कानच्या कामात गोंदिया जिल्ह्यातील एकाही सामाजिक संघटनेने मदत केलेली नाही. अशा खऱ्या अर्थाने समाजोपयोगी असणाऱ्या महत्वाच्या कामात सहकार्य न करणाऱ्या संस्था कोणत्या कामाच्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Only 31 boys and girls search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.