जिल्ह्यात केवळ १५ टक्केच धान कापणी
By Admin | Updated: October 30, 2015 01:58 IST2015-10-30T01:58:08+5:302015-10-30T01:58:08+5:30
जिल्हा कृषी विभागाच्या नियोजनानुसार १ नोव्हेंबरपासून रबी हंगामाचे कार्य सुरू होणार आहे.

जिल्ह्यात केवळ १५ टक्केच धान कापणी
यंदा उत्पन्न घटणार : भारी धानाला एका पाण्याची गरज
गोंदिया : जिल्हा कृषी विभागाच्या नियोजनानुसार १ नोव्हेंबरपासून रबी हंगामाचे कार्य सुरू होणार आहे. मात्र आतापर्यंत खरिप हंगामातील केवळ १५ टक्केच हलक्या धानपिकांची कापणी झाल्यामुळे रबीचे कार्य लांबण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी गरजेच्या वेळीच पाऊस खोळंबल्याने खरीप धानपिकांच्या रोवण्या लांबल्याने आता कापणीसुद्धा लांबणार अशात रबी हंगामावर परिणाम होणार, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामाची स्थिती पाहता सुरूवातीला पाऊस आला. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रोपवाटिका घातल्या. मात्र त्यानंतर पावसाने दगा दिला. त्यामुळे काही शेतकरी पावसाची वाट बघत राहिले. पुन्हा पाऊस आल्यावर त्यांनी रोपवाटिकेसाठी धानबियाणे रोवले. मात्र रोपवाटिकेला पाण्याची गरज असताना पाऊस पडला नाही. यानंतर पऱ्हे लावणीसाठी पावसाची प्रतीक्षा करावी लागली. तेव्हाही पाऊस लांबल्याने पऱ्हे उशीरा लागले. आता हलक्या जातीचे धान कापणीवर असताना भारी जातीच्या धानाला एका पाण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगतात. हलक्या जातीच्या धानपिकांच्या कापणीनंतर भारी धानपिकांची कापणी होईल. त्यामुळे यंदा रबी हंगामाची कामे लांबणीवर जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
यावर्षी खरिपाच्या पिकांना मावा व तुडतुडा रोगाने ग्रासले. मावामुळे जवळपास अर्धे धान नष्ट झाल्याचे शेतकरी सांगतात. तर पावसाने वेळेवर यंदा दगा दिल्याने याचा परिणाम धानपिकांवर झाला. जिल्ह्यात काही ठिकाणी तुडतुडा व कीड रोगामुळे धान पोखरले गेले. या सर्व प्रकारामुळे यंदा धानाचा उतारा खूपच कमी होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याची भरपाई रबी हंगामात करता येईल, अशी आशा त्यांना आहे.
कृषी विभागाने रबीच्या पिकांसाठी एकूण ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र नियोजित केले आहे. मात्र पाऊस-पाण्यानुसार रबीच्या क्षेत्रात कमी-अधिक वाढ होत असल्याचे जिल्हा कृषी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
रबीची सुरूवात लाखोळी व जवसाने
कृषी विभागाच्या नियोजनानुसार १ नोव्हेंबरपासून लाखोळी व जवस या रबी हंगामाच्या पिकांची लागवड सुरू होणार आहे. तर गव्हू व हरभरा पिकाला पाण्याची गरज असल्यामुळे त्यांची लागवड १५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. खरिपाच्या धानाची कापणीच अद्याप पूर्ण न झाल्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत शेतकरी रबी पिकांसाठी शेतीच्या कामात गुंतला राहण्याची शक्यता कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.