ऑनलाईन शिक्षण नावापुरतेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:59+5:302021-07-07T04:35:59+5:30
केशोरी : आनंददायी शिक्षणाअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापकांसह शिक्षक उभे राहून विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब ...

ऑनलाईन शिक्षण नावापुरतेच
केशोरी : आनंददायी शिक्षणाअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर मुख्याध्यापकांसह शिक्षक उभे राहून विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्पासह गोड खाऊचे वितरण करून शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंदोत्सव साजरा करण्यात येत असे. शाळेचा पहिला दिवस म्हटले की, विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा दिवस. नवा गणवेश, नवी पुस्तके या उपक्रमामुळे बालकांचा आनंद द्विगुणित होत होता.
यावर्षी कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे विद्यार्थ्यांचा आनंद हिरावून घेतला. शाळेच्या बोलक्या भिंती विद्यार्थ्यांच्या येण्याची वाट पाहत आहेत. शिक्षक शाळेत आणि विद्यार्थी घरी अशी परिस्थिती निर्माण झाली. गेल्यावर्षीपासून कोरोनाच्या भीतीमुळे शिक्षणाची पुरती वाट लागली. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवनाचे अतोनात नुकसान झाले. ऑनलाईन शिक्षण प्रणाली आणून शासनाने थोडा फार प्रयत्न केला. परंतु ऑनलाईन शिक्षण प्रणाली फक्त नावापुरतीच राहिली. कारण आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थी गरीब आणि उपेक्षित समाजातील असतात. त्यांना स्मार्ट फोन घेणे शक्यच नाही. फक्त १० टक्के विद्यार्थी स्मार्ट फोन घेऊन ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा उपयोग करताना दिसले. त्यातही नेटवर्क नियमित उपलब्ध होत नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा झाला. त्यामुळेच कदाचित शासनाला परीक्षा न घेताच पुढील वर्गात वर्गोन्नती देण्याचा निर्णय घ्यावा लागला. यावर्षीसुद्धा २८ जूनपासून शाळेचे सत्र सुरू झाले; परंतु अजूनही कोरोना महामारीचे संकट डोक्यावर घोंगावत असल्यामुळे फक्त शिक्षकांसाठी शाळा सुरू झाल्या; मात्र प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य बंद आहेत. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थितांचे आदेश दिल्याने शाळेचा पहिला दिवस विद्यार्थीविनाच सुरू झाले. शाळेच्या बोलक्या भिंती विद्यार्थ्यांची वाट पाहत उभ्या आहेत. विद्यार्थीसुद्धा शाळेत जाण्यास उत्सुक व आनंदी आहेत; मात्र विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होण्याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.