'One village-one Ganapati' in 3 villages | ४१६ गावांत ‘एक गाव-एक गणपती’

४१६ गावांत ‘एक गाव-एक गणपती’

ठळक मुद्दे९५४ गावांत सार्वजनिक गणपती : ५२०७ खासगी गणपतींची स्थापना होणार

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटलांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत समित्यांनी ‘एक गाव-एक गणपती’ची सुरूवात केली. गणेशोत्सात गावची शांतता अबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने यंदा जिल्ह्यातील ४१६ गावांत ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. तर ९५४ ठिकाणी सार्वजनिक गणपती मांडले जाणार असून पाच हजार २०७ घरांत गणपतींची स्थापना होणार आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू होण्यापूर्वी एका गावात अनेक गणपतींची मूर्ती माडली जायची. त्यातून आपल्या मंडळाचा देखावा आकर्षक असावा, आपल्याच कार्यक्रमांना लोकांनी प्रतिसाद द्यावा, आपल्या मंडळाची मूर्ती जास्त आकर्षक असावी अशा भावनेतून गणेश उत्सव मंडळांमध्ये चढाओढ असायची. यातूनच गावातील अनेक गणेश मंडळांचे वाद व्हायचे व गावची शांतता धोक्यात येत होती.
या उत्सवादरम्यान गावची शांतता अबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना जिल्ह्यातील ४१६ गावांत राबविली जात आहे. त्यानुसार, गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत २, गोंदिया ग्रामीण २०, रावणवाडी २८, तिरोडा २५, गंगाझरी २०, दवनीवाडा ५, आमगाव २४, गोरेगाव ३३, सालेकसा ५, देवरी ३४, चिचगड ४४, डुग्गीपार ४३, नवेगावबांध २१, अर्जुनी-मोरगाव ३६, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत २१ गावांत एकच गणपती स्थापन केले जाणार आहे.
याशिवाय, गोंदिया शहरात सार्वजनिक ८२ तर खासगी ९३० मूर्तिची स्थापना केली जाणार आहेत. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ६५ तर खासगी ५००, गोंदिया ग्रामीण अंतर्गत सार्वजनिक ११० तर खासगी ४००, रावणवाडी अंतर्गत सार्वजनिक ६२ तर खासगी ३००, तिरोडा अंतर्गत सार्वजनिक ४७ तर खासगी २५०, गंगाझरी अंतर्गत सार्वजनिक ३७ तर खासगी ७२, दवनीवाडा अंतर्गत सार्वजनिक १३ तर खासगी ७०, आमगाव अंतर्गत सार्वजनिक ६३ तर खासगी ७५०, गोरेगाव अंतर्गत सार्वजनिक ५५ तर खासगी ३२५, सालेकसा अंतर्गत सार्वजनिक १०४ तर खासगी २१५, देवरी अंतर्गत सार्वजनिक ५९ तर खासगी २२५, चिचगड अंतर्गत सार्वजनिक ५५ तर खासगी ४०, डुग्गीपार अंतर्गत सार्वजनिक ८२ तर खासगी २७०, नवेगावबांध अंतर्गत सार्वजनिक २६ तर खासगी १६५, अर्जुनी-मोरगाव अंतर्गत सार्वजनिक ६६ तर खासगी ३७०, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक २८ तर खासगी ३२५ गणपतींची स्थापना होणार आहे.
लोकमान्य उत्सवाकडे पाठ
गणेशोत्सवाचे प्रणेते बाळ गंगाधर टिळक यांनी १२८ वर्षांपूर्वी गणेशोत्सवाला सुरूवात केली. त्यांचे व्यक्तीमत्व आजच्या तरूण पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्टÑ शासनाने सार्वजनिक गणेशोत्सवाला लोकमान्य उत्सव राबवायचे म्हणून सन २०१६ मध्ये लोकमान्य उत्सवाची सुरूवात केली होती. मात्र दुसऱ्याच वर्षापासून या उत्सवाला बंद करण्यात आले. स्वदेशी, साक्षरता, व्यसनमुक्ती, बेटी बचाओ व जलसंवर्धन यावर जनजागृती करण्याचा उपक्रम पहिल्या वर्षी राबविला. परंतु दुसºया वर्षापासून या उत्सवाला तिलांजली देण्यात आली. गणेशोत्सवात सामाजिक उपक्रमाला चालना देण्यासाठी शासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे.
चोख बंदोबस्तासाठी पथक
गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा पोलिसांकडून पथक तयार करण्यात येणार आहेत. यात, दंगल नियंत्रक तीन पथक, चार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी एक ट्रॅकींग फोर्स, पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रत्येकी एक ट्रॅकींग फोर्स व सी-६० चे पथक राहणार आहेत. शिवाय बॉम्बशोध- नाशक पथकही नेमण्यात आले आहे.
सुरक्षा दल राहणार सज्ज
गावातील सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेतला आहे. गावातील सण, उत्सव, मेळावे, महापुरूषांच्या जयंती, पुण्यतिथी पोलीस बंदोबस्ताशिवाय पार पाडता याव्या यासाठी तंटामुक्त समित्यांनी आपापल्या गावात ग्राम सुरक्षा दलाला सज्ज केले आहे. मूर्तिच्या सुरक्षिततेसाठी उत्सव मंडळ व ग्राम सुरक्षा दलाने पुढाकार घेतला आहे.
मंडळानी हे करावे
गणपती उत्सव साजरा करताना गणेशोत्सव मंडळांनी चोरीची वीज वापरू नये, मूर्ती मांडलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी पडणार नाही, मूर्तिच्या सुरक्षेची संपुर्ण जबाबदारी मंडळाच्या सदस्यांनी घ्यावी व जनावरे मंडपात येणार नाही याची काळजी घ्यावी.

Web Title: 'One village-one Ganapati' in 3 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.