काळी-पिवळीच्या वाहतुकीसाठी घेतली एक हजाराची लाच

By Admin | Updated: November 9, 2016 01:35 IST2016-11-09T01:35:39+5:302016-11-09T01:35:39+5:30

आमगाव-देवरी मार्गावर काळी-पिवळी जीपगाडीने प्रवासी वाहतूक करण्यासाठी एक हजार रुपये महिना

One thousand bribe for black and yellow transportation | काळी-पिवळीच्या वाहतुकीसाठी घेतली एक हजाराची लाच

काळी-पिवळीच्या वाहतुकीसाठी घेतली एक हजाराची लाच

हवालदाराला अटक : गोंदिया एसीबीची कारवाई
आमगाव (गोंदिया) : आमगाव-देवरी मार्गावर काळी-पिवळी जीपगाडीने प्रवासी वाहतूक करण्यासाठी एक हजार रुपये महिना मागणाऱ्या व ती रक्कम एका होमगार्डमार्फत स्वीकारणाऱ्या आमगाव पोलीस स्टेशनमधील वाहतूक हवालदाराला रंगेहात पकडण्यात आले. इसन जानुजी कवास (४१) असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे. होमगार्ड नितेश लोकचंद खांडेकर (३९) यालाही अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, देवरी ते आमगाव या मार्गावर अनेक काळी-पिवळी गाड्यांमधून प्रवासी वाहतूक केली जाते. या प्रकरणातील तक्रारकर्त्यानेही त्याप्रमाणे आपल्या गाडीतून प्रवासी वाहतूक सुरू केली. मात्र आमगाव पोलीस स्टेशनमधील वाहतूक हवालदार इसन जानुजी कवास (४१) यांनी या मार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी काळीपिवळी चालवायची असेल तर दरमहा एक हजार रुपये द्यावे लागतील असे बजावले. मासिक ठरविलेली रक्कम न दिल्यास कारवाई केली जाईल, अशीही तंबी दिली. त्यामुळे सदर तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाकडे तक्रार केली.
या प्रकरणात आरोपी कवास व होमगार्ड खांडेकर हे तक्रारकर्त्या काळीपिवळीच्या मालकाला ७ नोव्हेंबरपर्यंत रक्कम आणून देण्यासाठी दबाव टाकत होते. त्यामुळे ८ नोव्हेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमगावच्या आंबेडकर चौक येथे दुपारी सापळा रचून लाचेची रक्कम नितेश खांडेकर याच्यामार्फत स्वीकारताना हवालदार इसन कवास यांना अटक केली. दोघांविरूद्ध आमगाव ठाण्यात कलम ७, १२, १३, (१) (५), सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक संजय दगडे व अप्पर पोलीस अधीक्षक राकेश शर्मा, नागपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक दिनकर ढोसरे, प्रमोद घोंगे, प्रमोद चौधरी, सहायक फौजदार दिवाकर भदाडे, हवालदार राजेश शेंद्रे, रंजीत बिसेन, दिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, वंदना बिसेन, देवानंद मारबते, हेमंत उपाध्याय, कोमलचंद बनकर आदींनी केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: One thousand bribe for black and yellow transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.