एक लाख महिला उन्नतीच्या मार्गावर

By Admin | Updated: January 21, 2016 01:35 IST2016-01-21T01:35:42+5:302016-01-21T01:35:42+5:30

महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम व्हावे आणि त्यातून उन्नती साधावी यासाठी केंद्र सरकारच्या योजनेनुसार बचत गट बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

One lakh women on the path of growth | एक लाख महिला उन्नतीच्या मार्गावर

एक लाख महिला उन्नतीच्या मार्गावर

विविध व्यवसायांना चालना : ४४६७ बचत गटांना दिले ९.७९ कोटींचे कर्ज
नरेश रहिले गोंदिया
महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम व्हावे आणि त्यातून उन्नती साधावी यासाठी केंद्र सरकारच्या योजनेनुसार बचत गट बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या बचत गटांच्या माध्यमातून शासनाकडून विविध व्यवसायांकरिता कर्ज घेऊन आर्थिक प्रगती साधण्यासाठी जिल्ह्यातील एक लाख ४ हजार ६१० महिला सरसावल्या आहेत. सन २००७ पासून राबविल्या जात असलेल्या या योजनेंत आतापर्यंत ४४६७ बचत गटांना ९ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव वगळता इतर सात तालुक्यात ९ हजार ५१० बचत गट असून या सात तालुक्यातील ४ हजार ४६७ बचत गटांना ९ कोटी ७९ लाख ९० हजार ६०६ रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले. शासनाने बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचा जीवनाचा आधार मिळाला आहे.
सडक-अर्जुनी तालुक्यात ११३१ गटांपैकी ३११ बचत गटांना ६० लाख ८१ हजार ८२६ रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. देवरी तालुक्यात १११४ गटांपैकी २७६ बचत गटांना ३० लाख ७ हजार ९२० रूपयांचे कर्ज, सालेकसा तालुक्यात १०७२ गट असून त्यांना ३ कोटी १९ लाख ८८ हजार ५८४ रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. आमगाव तालुक्यात १११८ गटांपैकी ३१२ बचत गटांना ६६ लाख ८९ हजार ६५८ रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले.
गोरेगाव तालुक्यात १४५६ गटांपैकी ४१३ बचत गटांना ७६ लाख १६ हजार ६८५ रूपयांचे कर्जवाटप केले आहे. तिरोडा तालुक्यात १६३६ गटांना २ कोटी ८५ लाख ७७ हजार ५९२ रूपये तर गोंदिया तालुक्यात १९८३ गटांपैकी ४३८ बचत गटांना १ कोटी ४० लाख ३४१ रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. कर्जाच्या स्वरूपात घेतलेल्या रकमेतून महिला जिल्ह्यात सर्वात जास्त शेळीपालनाचा व्यवसाय करीत आहेत. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या बचत गटांची संख्या त्याखालोखाल आहे.
जिल्ह्यातील १५ बचत गटांनी स्वत:च्या दुग्ध डेअरी सुरू केल्या आहेत. महिलांनी कुठलाही पैसा खर्च न करता अगरबत्ती, मेनबत्ती, पोल्ट्री फार्म, आलू लागवड आदी कामे केली आहेत. ग्रामीण भागातील महिला आता बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन उन्नती साधण्याचा ध्यास घेत आहेत.

Web Title: One lakh women on the path of growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.