दोन अपघातात १ ठार, १६ जखमी

By Admin | Updated: April 28, 2015 23:53 IST2015-04-28T23:53:48+5:302015-04-28T23:53:48+5:30

आठवडी बाजारातील लोकांना पिंडकेपार येथे घेऊन जाणारा आॅटो उलटून एक महिला ठार तर १३ प्रवासी जखमी झाले.

One killed and 16 injured in two accidents | दोन अपघातात १ ठार, १६ जखमी

दोन अपघातात १ ठार, १६ जखमी

प्रवासी आॅटो उलटला : बोरगावजवळ कार झाडावर आदळली
देवरी : आठवडी बाजारातील लोकांना पिंडकेपार येथे घेऊन जाणारा आॅटो उलटून एक महिला ठार तर १३ प्रवासी जखमी झाले. दुसऱ्या अपघातात नवीन घेतलेली फोर्ड क्लासिक कार झाडावर धडकून भागी येथील असाटी परिवारातील तिघे गंभीर जखमी झाले. हे दोन्ही अपघात बोरगावजवळ घडले.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारचा आठवडी बाजार आटोपून पिंडकेपार येथील लोक आॅटोने (एमएच ४०- पी १८४३) गावाकडे जात असताना बोरगाव नाला वळणावर दुपारी २ वाजतादरम्यान त्यांचा आॅटो उलटला. क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे तब्बल १४ प्रवासी त्यात भरल्याने हा आॅटो वळणावर अनियंत्रित होऊन उलटला. यात जयवंता पतिराम उईके (७५) ही वृद्धा ठार झाली. जखमींतील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोंदियाला हलविण्यात आले आहे.
जखमींमध्ये हरिकिशन बाबूलाल चौबे (६५, रा.देवरी), विजय उईके (३०,रा.सडक-अर्जुनी), किशोर आसाराम राऊत (२५, रा.पिंडकेपार), देवका सुंदर टेकाम (५०, रा.झुंझारीटोला), चिंतामन शिवलाल नागदेवे (५०, रा.टेकाबेदर), सीता जगन भोयर (५०, रा.बोरगाव) हे सहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना गोंदियाला हलविण्यात आले. याशिवाय श्रीकांत देवीराम उईके (१८, रा.चिखली), ललीता चिंतामन नागदेवे (४०, रा.टेकाबेदर), राजू जयपाल नाईक (४, रा.पींडकेपार), प्रशांत प्रकाश रामटेके (२७, रा. टेकाबेदर), मच्छींद्र सोनवाने (५०, रा.सुब्रायटोला), अंजना सुनील घासले (३५, रा.पींडकेपार), माया विजय उईके (२७, रा.सडक-अर्जुनी) या सात प्रवाशांना किरकोळ मार लागल्याने त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे येथील ग्रामीण रूग्णालयात दोन रूग्णवाहीका असून त्यातील एक नादुरूस्त असल्याने एकच रूग्णवाहीका चालू आहे. त्यामुळे दुसऱ्या एका खाजगी वाहनातून जखमींना गोंदियाला हलवावे लागले.
भागी येथील अभागी असाटी कुटुंब
नवीन घेतलेल्या कारचा आनंद भागी गावच्या असाटी कुटुंबियांना नियतीने पाहू दिला नाही आणि त्या अभागी ठरलेल्या कुटुंबावर काळाचा आघात झाला. भरधाव वेगात असलेली त्यांची कार ३ किमी अंतरावर असलेल्या बोरगाव येथे झाडावर आदळली. हा अपघात सोमवारी (दि.२७) रात्री ११ वाजतादरम्यान घडला. तीनपैकी एका जखमीची प्रकृती चिंताजनक असून त्यांना नागपूरला हलविले आहे.
प्राप्त माहितीनुसार, ग्राम भागी येथील असाटी बंधुंनी नवीन फोर्ड क्लासिक कार खरेदी केली होती. सोमवारी (दि.२७) गोंदियाच्या आरटीओ कार्यालयात कार पासिंग करून व बाजारात इतर साहित्याची खरेदी करून ते गावी परत येत असताना रात्री ११ वाजतादरम्यान भरधाव वेगात असलेली त्यांची कार झाडाला धडकली.
ही धडक एवढी जबर होती की कारचा समोरचा भाग पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला. कारमध्ये बसलेले राकेश नर्मदाप्रसाद असाटी (३९), नितेश नर्मदाप्रसाद असाटी (३६) व शैलेश नर्मदाप्रसाद असाटी (२८) हे तिघे जखमी झाले. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कारच्या भागच्या सीटवर बसलेले सर्वात मोठे भाऊ राकेश यांच्या डोक्यावर जास्त मार असल्याने त्यांना लगेच नागपूरला हलविण्यात आले. शैलेष देवरीमध्ये असून नितेशला गोंदियाला हलविण्यात आले आहे. नितेश व शैलेश हे समोरच्या सीटवर सेफ्टी बेल्ट लावून बसले असल्यामुळे ते बचावले असल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: One killed and 16 injured in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.