दिवाळीनंतरही अधिकारी व कर्मचाऱ्यांची दांडी
By Admin | Updated: October 28, 2014 22:58 IST2014-10-28T22:58:22+5:302014-10-28T22:58:22+5:30
दिवाळी सण भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. सामान्य माणसांपासून ते नोकरदार वर्ग व फेरीवाला ते व्यापारी-व्यावसायीकही दिवाळीचा आनंद उपभोगण्यासाठी नियोजन करून ठेवतात.

दिवाळीनंतरही अधिकारी व कर्मचाऱ्यांची दांडी
गोंदिया : दिवाळी सण भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. सामान्य माणसांपासून ते नोकरदार वर्ग व फेरीवाला ते व्यापारी-व्यावसायीकही दिवाळीचा आनंद उपभोगण्यासाठी नियोजन करून ठेवतात. परंतु दिवाळीच्या सुट्ट्या संपूनही शासकीय विभागात काम करणारे काही अधिकारी व कर्मचारी रीतसर सुट्टी न घेताच आपापल्या कार्यालयाला दांडी मारून बसल्याचे दिसून आले.
रविवार (दि.२६) हा दिवस दिवाळीच्या सुट्टीचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर सोमवारपासून शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना आपापल्या कार्यालयात उपस्थित होणे अनिवार्य होते. किंवा येणे न जमल्यास रीतसर सुट्टीचे अर्ज देऊन सुट्टी मंजूर करून घेणे अपेक्षित होते. परंतु अनेक कार्यालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे दिसून आले.
गोंदियात जवळपास सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत अन्न पुरवठा विभाग, भूमी अभिलेख विभाग, नगर रचना विभाग असे महत्त्वपूर्ण कार्यालय आहेत. जिल्हा परिषदेतही अनेक विभागाची स्वतंत्र कार्यालये आहेत. मात्र अनेक विभागात अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची सोमवारी वानवा होती. अन्न पुरवठा विभागात तर तीन कर्मचाऱ्यांनी कसलेही सुट्टीचे अर्ज न देता कार्यालयाला दांडी मारल्याचे ऐकीवात आहे.
काही कार्यालयांत तर सोमवार शिवाय मंगळवारीसुद्धा काही कर्मचारी कामावर रूजू न झाल्याचे आढळून आले. तिरोडा शहरात उपजिल्हा रूग्णालय आहे. मंगळवारी २८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता भेट दिली असता येथील ओपीडी बंदच होती. परिचारिकांशिवाय कोणताही जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी दिसून आले नाही. रूग्णांना तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारी तसेच औषध वितरण विभागात कोणताही औषध निर्माता नसल्याचे आढळल्याचे तिरोडा येथून काही लोकांनी दूरध्वनीवरून लोकमतला सांगितले. या प्रकारामुळे औषधोपचार करण्यासाठी आलेल्या रूग्णांची व त्यांच्या नातलगांची मोठीच गैरसोय झाली.
आजच्या महागाईच्या काळात सामान्य माणसांची दिवाळी केवळ एक किंवा दोन दिवसांची राहिली आहे. तेही कर्ज काढूनच आपल्या दिवाळीचा खर्च भागवितात. परंतु या शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांची दिवाळी अद्यापही संपली नसल्याचेच या प्रकारावरून दिसून येते. या शासकीय कर्मचाऱ्यांकडे पैशाची कमतरता नसते. त्यामुळे ते कार्यालयांना दांडी मारून व रीतसर सुट्टीचे अर्ज न देताच दिवाळीचा आनंद अधिक दिवस साजरा करतात. मात्र या प्रकाराने आपल्या विविध कामांसाठी शासकीय कार्यालयांत जाणाऱ्या सामान्य जनतेची मोठीच गैरसोय होत असल्याचे दिसून येते.
खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्या अधिक मिळतात. आता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच अनेक शासकीय सुट्ट्या असल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची ‘फुल टू धम्माल’ आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना १ ते ९ नोव्हेंबरपर्यंत एक दिवसाआड सुट्टी आली आहे. (प्रतिनिधी)