केवळ १२१ मंडळांकडे अधिकृत वीज जोडणी

By Admin | Updated: September 29, 2014 23:06 IST2014-09-29T23:06:44+5:302014-09-29T23:06:44+5:30

जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांकडून ५६१ नवदुर्गा आणि ५५१ शारदा मूर्तींची स्थापन करण्यात आली आहे. मात्र या एकूण १,११२ मंडळांपैकी केवळ १२१ सार्वजनिक मंडळांनीच अधिकृतपणे विजेची

Official power connection to 121 circles only | केवळ १२१ मंडळांकडे अधिकृत वीज जोडणी

केवळ १२१ मंडळांकडे अधिकृत वीज जोडणी

एकूण १११२ मंडळ : वीजचोरीला महावितरणचेच अभय
गोंदिया : जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांकडून ५६१ नवदुर्गा आणि ५५१ शारदा मूर्तींची स्थापन करण्यात आली आहे. मात्र या एकूण १,११२ मंडळांपैकी केवळ १२१ सार्वजनिक मंडळांनीच अधिकृतपणे विजेची जोडणी (कनेक्शन) घेतल्याची माहिती वीज वितरण कंपनीने दिली आहे. त्यामुळे उर्वरित ९९१ मंडळांकडे असलेला वीज पुरवठा चोरीचा किंवा अवैध मार्गाने घेतलेला असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र अद्याप वीज चोरीचा एकही गुन्हा वीज कंपनीचे अधिकारी उघडकीस आणू शकलेले नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने गणेश मंडळांप्रमाणेच दुर्गाेत्सव मंडळांनाही वीज चोरीची खुली सूट दिल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
देवीचा पवित्र उत्सव साजरा करताना उत्सव मंडळांनी अधिकृतरित्या विद्युत कनेक्शन घेवून उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे. परंतु अनेक लोक रस्त्यारस्त्यावर देवीचे मंडप टाकून चोरीची वीज वापरत असल्याचे प्रकार दिसून येतात. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विद्युत वितरण कंपनीतर्फे पोलीस ठाण्यांना विनंती करून दुर्गादेवीच्या मंडळांना मूर्ती मांडण्याची परवानगी देताना त्या ठिकाणी तुमच्याकडे अधिकृतरित्या वीज कनेक्शन आहे किंवा नाही याची शहनिशा करूनच परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. पोलीस विभागाने परवानगी देताना या बाबीचा विचारच केला नाही. परंतु विद्युत विभागाने कनेक्शन न घेणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यासाठी पुढाकारही घेतला नाही. एका मंडळात विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी कारवाई करण्यास गेल्यावर त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असते.
देवीचा उत्सव हा धार्मिक उत्सव असल्यामुळे विद्युत वितरण कंपनी या मंडळांवर कारवाई करण्यास धजावत नाही. मग अशावेळी सर्वांसाठीच वीजचोरी खुली का करत नाही, असा सवाल गोंदिया शहरातील अधिकृतरित्या वीज पुरवठा घेणाऱ्या ३३ मंडळांनी केला आहे. तिरोडा सर्कलमधील ३३ मंडळांनी, गोरेगाव येथील एका मंडळाने तर गोंदिया ग्रामीण सर्कलमधील २२ मंडळांनी विद्युत कनेक्शन घेतलेले आहे.
देवरी विभागांतर्गत येणाऱ्या आमगाव सर्कल अंतर्गत सात कनेक्शन, अर्जुनी/मोरगाव सर्कल अंतर्गत चार कनेक्शन, सडक/अर्जुनी सर्कल अंतर्गत ११ कनेक्शन, देवरी सर्कल अंतर्गत ७ कनेक्शन तर सालेकसा सर्कल अंतर्गत २२ कनेक्शन असे एकूण १२१ विद्युत कनेक्शन घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे महावितरण कंपनीने मंडळांसाठी स्वस्त दरात वीज देण्याची सोय केली आहे. तरीही त्याकडे मंडळांकडून दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Official power connection to 121 circles only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.