अधिकार्यांच्या बंगल्यांची वाट झाली कठीण
By Admin | Updated: May 17, 2014 23:45 IST2014-05-17T23:45:24+5:302014-05-17T23:45:24+5:30
येथील सिव्हील लाईंस परिसरात सुभाष बागेच्या शेजारीच वरिष्ठ अधिकार्यांचे शासकीय निवासस्थान आहेत. सध्या येथे निवासी उप जिल्हाधिकारी ते

अधिकार्यांच्या बंगल्यांची वाट झाली कठीण
गोंदिया : येथील सिव्हील लाईंस परिसरात सुभाष बागेच्या शेजारीच वरिष्ठ अधिकार्यांचे शासकीय निवासस्थान आहेत. सध्या येथे निवासी उप जिल्हाधिकारी ते न्यायाधीश यासारखे वरिष्ठ अधिकारी राहतात. मात्र आश्चर्याची बाब अशी की, या अधिकार्यांच्या घरचा रस्ता पार उखडून गेला असून येथून ये-जा करणे कठीण झाले आहे. काही वर्षांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र आजचे चित्र बघितल्यास येथे रस्ता होता की नाही असा विचार करावा लागतो. कोणत्याही शहरातील सिव्हील लाईंस भाग म्हटला की, शहरातील वरिष्ठ अधिकारी व उच्चभ्रुंचे निवासस्थान व सर्व सुविधायुक्त असा हा परिसर असतो. चांगले रस्ते, पथदिवे, स्वच्छता आदिंची पूर्तता या भागात असते व बघता क्षणीच सिव्हील लाईंस काय याबाबत समोरच्या व्यक्तीला समजून जाते. गोंदिया शहरात मात्र विपरीत परिस्थिती आहे. येथे वरिष्ठ अधिकारी व प्रतिष्ठीतांचे निवास असले तरिही पाहिजे तशा सुविधांचा येथे अभाव आहे. रस्ते तर बघता कामा नये, पथदिवे रात्री कमी व दिवसाच जास्त प्रकाशमान होतात. स्वच्छता बघायची झाल्यास पालिकेचा स्वच्छता विभागही लाजून जाणार असा घाणीने व्याप्त परिसर आहे. त्यातही विशेष बाब अशी की, सिव्हील लाईंस परिसरात असलेल्या शहरातील एकमेव सुभाष बागेच्या शेजारीच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्यांचे शासकीय निवासस्थान आहेत. बालक मंदिर मार्ग म्हणून शहरात या परिसराची ओळख आहे. येथील क्वार्टर्समध्ये उप वन संरक्षक, न्यायाधीश, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, निवासी उप जिल्हाधिकारी आदींसह अन्य वरिष्ठ अधिकार्यांचे निवासस्थान आहेत. त्यांना आवागमनासाठी बालकमंदिर मार्ग हा एकच रस्ता आहे. मात्र या रस्त्याची पार दुर्गत झाली आहे. हा डांबरी रस्ता असून आजघडीला मात्र या रस्त्यावरील डांबरीकरण उखडल्याचे चित्र आहे. तर रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले असल्याने या मार्गाने ये-जा करणे एक डोकेदुखीच झाली आहे. शिवाय रस्त्यावर सफाईचा अभाव आहे. रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचर्यांचे ढिगार लागल्याचे चित्र. काही वर्षांपूर्वी या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र आज या रस्त्यावर डांबरीकरणाचे नामोनिशान शिल्लक नाही. रस्ता चांगलाच उखडलेला असल्याने येथून वाहतूक करणे एक कसरत असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. शहरातील सामान्य नागरिकांचा तर कुणीच वाली नाही. मात्र नगर प्रशासनाने जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्यांनाही सोडले नाही. (शहर प्रतिनिधी)