ओबीसी विद्यार्थी धडकले तहसीलवर
By Admin | Updated: July 28, 2016 00:05 IST2016-07-28T00:05:41+5:302016-07-28T00:05:41+5:30
ओबीसीच्या विविध मागण्या घेवून बुधवारी तालुक्यातील शाळा, महाविद्यालयाने बंद पुकारुन विराट मोर्चा

ओबीसी विद्यार्थी धडकले तहसीलवर
दिवसभर शाळा बंद : मोर्चाने सालेकसा दणाणले
सालेकसा : ओबीसीच्या विविध मागण्या घेवून बुधवारी तालुक्यातील शाळा, महाविद्यालयाने बंद पुकारुन विराट मोर्चा काढत ओबीसी विद्यार्थ्यांनी संपूर्ण सालेकसा भ्रमण केला. तहसील कार्यालयावर मोर्चा हजारोच्या संख्येत काढण्यात आला. ओबीसी विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाने सालेकसा परिसर दणाणले.
ओबीसी विद्यार्थी आघाडी, ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ आणि महात्मा फुले समता परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवारी तालुक्यातील सर्व शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मुख्यालयासह तालुक्यातील इतर गावातील शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला मुख्यालयासह तालुक्यातील इतर गावातील शाळा, कॉलेज बंद ठेवून मुख्यालयात धडक देवून विशाल मोर्चा काढण्यात आला.
गडमाता रोड परिसरातून मोर्चाचे आयोजन करुन संपूर्ण सालेकसा शहराचे भ्रमण करीत तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी तहसीलदार प्रशांत सांगळे यांना निवेदन देवून मोर्चाचे विसर्जन करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व ओबीसी संघाचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांच्यासह सोहन क्षीरसागर, गुणवंत बिसेन, उमेदलाल जैतवार, राकेश रोकडे, रविंद्र चुटे, मधू हरिणखेडे, शैलेष बहेकार, नेपाल पटले, प्रकाश टेंभरे, राजेंद्र बागळे यांच्यासह सेकडो ओबीसी कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले. प्रमुख मागण्यांमध्ये भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती १०० टक्के मिळावी, नॉनक्रिमिलेयरची जाचक अट रद्द करावी, ओबीसी जातनिहाय जनगनणा जाहीर करावी, ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय गठित करण्यात यावे, ओबीसी साठी स्वतंत्र वसतिगृहाची सोय व्हावी, एस.सी., एस.टी. प्रमाणे ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी इत्यादी मागण्यांचा समावेश होता. या मोर्च्यात विद्यार्थ्यांसह समाजातील विविध घटक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, कर्मचारी आदी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)