न.प.ने फुंकला कर वसुलीचा शंख
By Admin | Updated: February 2, 2016 01:39 IST2016-02-02T01:39:02+5:302016-02-02T01:39:02+5:30
९ कोटी ६५ लाख रूपयांच्या कर वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी नगर परिषदेच्या कर वसुली विभागाने सोमवारपासून (दि.१) वसुली मोहिमेचा शंख फुंकला.

न.प.ने फुंकला कर वसुलीचा शंख
पहिल्या दिवशी तीन लाख : बाजार भागात छेडली मोहीम
गोंदिया : ९ कोटी ६५ लाख रूपयांच्या कर वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी नगर परिषदेच्या कर वसुली विभागाने सोमवारपासून (दि.१) वसुली मोहिमेचा शंख फुंकला. मोहिमेच्या पहिल्या दिवशी कर वसुली विभागाच्या पथकाने बाजार परिसरात मोहीम छेडून थकबाकीदारांकडे दस्तक दिली. पहिल्याच दिवशी पथकाने रोख व धनादेश अशी सुमारे तीन लाख रूपयांची कर वसुली केली आहे.
कर वसुली पथकाने पहिल्याच दिवशी बाजार परिसरात मोहीम झेडली. यात पथकाने दोन लाख २४ हजार रूपये रोख तर ५५ हजार रूपयांचे धनादेश मिळविले आहेत. पुढे आणखी जोमाने काम करण्याची तयारी पथकाने दर्शविली.
जुनी थकबाकी व चालू वर्षातील अशा प्रकारे सुमारे नऊ कोटी ६५ लाख रूपयांची कर वसुली नगर परिषदेला करायची आहे. कर वसुलीची विशेषता अशी की यात सामान्य नागरिकांकडे कमी व धनाढ्यांकडे जास्त थकबाकी आहे. कर वसुलीच्या या कामात राजकीय अडसर येत असल्याने कराची थकबाकी वाढतच गेली आहे. मात्र मागील वर्षापासून कठोरतेने कर वसुली विभागाने मोहीम छेडल्याने त्याचे फलीतही मिळाले होते. मागील वर्षी ५० टक्केच्या वर कर वसुली झाल्याची नगर परिषदेतील ही पहिलीच कामगिरी होती. यावर्षी किती लक्ष्यपूर्ती होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता हे वर्ष आर्थिक वर्ष संपन्यासाठी दोन महिने उरले असून त्यात नऊ कोटी ६५ लाखांचा आकडा गाठायचा असल्याने कर वसुली विभाग सोमवारपासून (दि.१) पुन्हा कामाला लागला आहे. कर वसुलीसाठी पथकाने बाजार परिसरातील थकबाकीदारांकडे धडक दिली. परिणामी कर वसुली पथकाने पहिल्याच दिवशी चांगली मोठी रक्कम वसुल करून आणल्याची माहिती आहे. आता पुढे आणखी जोमात कर वसुलीची मोहीम छेडली जाणार असून मागील वर्षाप्रमाणेच यंदाही कुणाची गय केली जाणार नसून कठोरतेने वसुली केली जाणार असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)
वसुली पथकाचे गठन
कर वसुलीचे काम अत्यंत किचकट व तेवढेच धोक्याचे असल्याने नगर परिषदेने यंदाही कर वसुलीसाठी पथकाचे गठन केले आहे. या पथकामध्ये नगर परिषदेच्या कर विभागातील कर्मचाऱ्यांसह विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. पथकाच्या एकत्रीत कारवाईने मागील वर्षी नगर परिषदेला चांगले रिजल्ट मिळाले होते हे विशेष.