जिल्ह्यात पहिल्यांदाच मात करणाऱ्यांचा आकडा शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST2021-02-09T04:32:15+5:302021-02-09T04:32:15+5:30
गोंदिया : मागील वर्षी २७ मार्चला जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने बाधितांच्या संख्येत वाढ होत गेली. मात्र दिलासादायक ...

जिल्ह्यात पहिल्यांदाच मात करणाऱ्यांचा आकडा शून्य
गोंदिया : मागील वर्षी २७ मार्चला जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने बाधितांच्या संख्येत वाढ होत गेली. मात्र दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले होते. बाधित रुग्णांसह मात करणाऱ्या रुग्णांची संख्यासुद्धा दररोज वाढत होती. मात्र मागील दहा महिन्यांच्या कालावधीत सोमवारी मात करणाऱ्या रुग्णांची संख्या शून्य तर नवीन ८ रुग्णांची भर पडली आहे.
जिल्ह्यात कोरोनाला उतरती कळा लागली असून गोंदिया आणि तिरोडा तालुका वगळता इतर तालुक्यात रुग्णवाढीला पूर्णपणे ब्रेक लागल्याचे चित्र आहे. त्यामुळेच कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९० वर आली असून जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. मात्र यानंतरही नागरिकांना पुन्हा काही दिवस कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक ती काळजी घ्यावीच लागणार आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जिल्हावासीयांनी मागील दहा महिने जी काळजी घेतली तीच काळजी पुढेसुद्धा काही दिवस घेण्याची गरज आहे. सोमवारी जिल्ह्यात ८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यात गोंदिया तालुक्यातील ५ आणि तिरोडा तालुक्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ६६,७७६ रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५५,१२० नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत ६६,२२६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६०,०९५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४,२६० बाधित रुग्ण आढळले असून यापैकी १३,९८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ९० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.