न.प. हद्दीतील लोकांसाठी आता ‘अर्बन हेल्थ सेंटर’

By Admin | Updated: February 19, 2015 01:00 IST2015-02-19T01:00:14+5:302015-02-19T01:00:14+5:30

शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळावी यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) एक नवीनच संकल्पना राबविण्यात येत आहे.

N.P. 'Urban Health Center' for the people in the area | न.प. हद्दीतील लोकांसाठी आता ‘अर्बन हेल्थ सेंटर’

न.प. हद्दीतील लोकांसाठी आता ‘अर्बन हेल्थ सेंटर’

गोंदिया : शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळावी यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) एक नवीनच संकल्पना राबविण्यात येत आहे. गोंदिया व तिरोडा नगर परिषद क्षेत्रांतील नागरिकांसाठी एक कोटी १० लाख रूपयांच्या खर्चातून आता ‘अर्बन हेल्थ सेंटर’ उघडण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटनही छत्रपती शिवाजी जयंतीदिनी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
शहरातील लोकसंख्येत वाढ होतच आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सध्या एकच जिल्हा रूग्णालयाचा आधार आहे. जवळील व दूरच्या गावातील रूग्णही येथे उपचारासाठी येतात. त्यामुळे जिल्हा रूग्णालयावर मोठा ताण पडतो. हीच स्थिती तिरोड्याची आहे. त्यामुळे अनेकदा आरोग्य सेवा कोलमडण्याचे प्रकारही घडतात. कधीकधी प्राथमिक स्तराच्या उपचारासाठीही वाटच बघावी लागते. आता ही परिस्थिती बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राष्ट्रीय ग्रामी आरोग्य अभियानाप्रमाणे (एनआरएचएम) राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाला गती देण्यात येत आहे. या अभियानातून शहरात दोन ठिकाणी ‘अर्बन हेल्थ सेंटर’ उघडण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कल्याण समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणार आहे. या हेल्थ सेंटर्सच्या इमारतींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ही इमारत दुमजली राहणार असून याचे डिझायनिंगही मुख्य कार्यालयातून देण्यात आले आहे. या इमारतींचे बांधकाम पालिकेकडून जागा हस्तांतरीत झाल्यानंतर करण्यात येणार आहे.
याशिवाय या अभियानाच्या माध्यमातून इतर उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. महिला व लहान मुलांच्या दृष्टीने विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. तसेच उपक्रमानुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल. (प्रतिनिधी)
हजार लोकसंख्येला एक ‘आशा’
शहरातील लोकसंख्येच्या तुलनेनुसार आशा कार्यकर्तींची निवड करण्यात येणार आहे. एक हजार लोकसंख्येला एक आशा, यानुसार कार्यकर्तीची निवड होईल. तसेच या हेल्थ सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाया तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आदी पदे भरण्यात येणार आहेत.
खासगी डॉक्टरांना मिळणार भत्ता
शहरात अनेक खासगी रूग्णालये आहेत. यात विविध आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांना सदर हेल्थ सेंटर्समध्ये बोलावून विविध आजार व व्यांधींबाबत रूग्णांना मार्गदर्शन व उपचार करण्यात येईल. त्यासाठी संबंधितांना भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक विभागातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
महिला व शिशुंच्या आरोग्याची काळजी
प्रसूती झालेल्या महिला व शिशूंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मदर अ‍ॅण्ड चाईल्ड ट्रॅकिंग सॉफ्टवेअर विकसीत करण्यात आले आहे. त्या माध्यमातून वजन, रक्तदाब, शरीरातील साखरेचे प्रमाण, इतर व्याधी, दिलेले उपचार, लसीकरण याबाबत माहिती संकलित करून त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत काही ठिकाणी ही प्रणाली सुरू आहे. तिला आणखी अद्ययावत करण्यात येणार आहे.
महिला आरोग्य समितीची स्थापना
शहरात विविध ठिकाणी बचत गटांच्या धर्तीवर महिा आरोग्य समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. या समित्यांमध्ये स्थानिक महिलांचा समावेश राहणार आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक महिलेच्या आरोग्यविषयक घडामोडींवर नजर ठेवली जाईल. त्यांच्या आरोग्याच्या गरजा समजून त्यानुसार उपाययोजना करण्यात येणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनात या समित्या काम करणार आहेत.

Web Title: N.P. 'Urban Health Center' for the people in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.