न.पं. अध्यक्षपदाची निवडणूक २७ ला?
By Admin | Updated: November 18, 2015 01:56 IST2015-11-18T01:56:06+5:302015-11-18T01:56:06+5:30
जिल्ह्यातील चार नगर पंचायतींच्या पहिल्यावहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मतदारांनी स्पष्ट कौल दिला नाही.

न.पं. अध्यक्षपदाची निवडणूक २७ ला?
उत्सुकता शिगेला : गोरेगाव, देवरीत रहस्य कायम
गोंदिया : जिल्ह्यातील चार नगर पंचायतींच्या पहिल्यावहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मतदारांनी स्पष्ट कौल दिला नाही. त्यामुळे कोणती नगर पंचायत कोण काबीज करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या २६ किंवा २७ नोव्हेंबरला अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नगर पंचायतींच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मुंबईत दि.९ ला निघाली. त्यानंतर २५ दिवसांच्या आत अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक घेणे बंधनकारक आहे. त्यादृष्टीने ही निवडणूक घेण्यासाठी अजून बराच कालावधी शिल्लक असला तरी नगर पंचायतींचा कारभार लवकर मार्गी लागावा आणि रखडलेली कामे पुन्हा सुरू व्हावी यासाठी पदाधिकारी सत्तारूढ होणे गरजेचे आहे. त्यामुळे ही निवडणूक लवकर घेण्यासाठी जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. बुधवारी (दि.१८) याबाबतची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे.
‘अ’ वर्ग नगर पालिकेला लागू असलेले सर्व नियम या क वर्ग नगर पंचायतींना लागू राहणार आहेत. त्यामुळे सुरूवातीला अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केल्यानंतर दुसऱ्या सभेत विषय समित्यांच्या सभापतींची आणि नामनिर्देशित सदस्यांची निवड केली जाणार आहे.
चारपैकी तीन नगर पंचायतींवर महिला सदस्य अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. त्यात अर्जुनी मोरगाव येथे अनुसूचित जाती महिला, सडक अर्जुनी अनुसूचित जाती (सर्वसाधारण), देवरीत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तर गोरेगावात खुल्या प्रवर्गातील महिला नगर पंचायत अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. कोणाकडेही स्पष्ट बहुमत नसल्यामुळे कोणत्याही दोन किंवा तीन पक्षांना एकत्रित येऊनच सत्ता मिळवावी लागणार आहे. यात सर्वच ठिकाणी अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)