आता मी पप्पा कुणाला म्हणणार..........
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST2021-07-05T04:18:37+5:302021-07-05T04:18:37+5:30
विजय मानकर सालेकसा : तालुक्यातील पानगाव येथील ३८ वर्षीय कुटुंब प्रमुख अत्यल्प भूधारक शेतकरी देवेंद्र बोधनसिंह गराडे यांचा एक ...

आता मी पप्पा कुणाला म्हणणार..........
विजय मानकर
सालेकसा : तालुक्यातील पानगाव येथील ३८ वर्षीय कुटुंब प्रमुख अत्यल्प भूधारक शेतकरी देवेंद्र बोधनसिंह गराडे यांचा एक महिन्यापूर्वी वाडीत असलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला. देवेंद्रच्या मृत्युने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले. देवेंद्रच्या अकाली निधनाने वृध्द आई आणि दोन चिमुकल्या मुलांची जवाबदारी आता पत्नी हेमलताच्या खांद्यावर झाली. परंतु त्या कुटुंबाची जो कोणी भेट घेतो त्याला मन हेलावून टाकणारे हृदयस्पर्शी दृश्य पहायला मिळते. देवेंद्रच्या दोन चिमुकल्या मुलांपैकी छोटा मुलगा वडिलाच्या अंगावर खेळता खेळता जेमतेम पप्पा म्हणायला लागला होता आणि अचानक वडिलांचे छत्र हिरावल्याने आता मी पप्पा कुणाला म्हणणार हा त्याचा प्रश्न मन हेलावून टाकणारा आहे.
देवेंद्र गराडे यांच्याकडे अर्धा एकर शेती असून त्या शेतीत त्याने धान लावले होते. परंतु धान पिकावर रात्री वेळेत बेवारस जनावरांचा हैदोस वाढल्याने तो दररोज रात्रीच्या वेळेत शेतात जात होता. पिकाचे जनावरापासून संरक्षण करण्याचे प्रयत्न करीत होता. एक महिन्यापूर्वी रात्री ९ वाजताच्या सुमारास वाडीतल्या पायवाटेने शेताकडे जात असताना अंधारात त्याला रस्ता गवसला नाही आणि रस्त्यालगत असलेल्या जुन्या विहिरीत पडून देवेंद्रचा मृत्यू झाला. देवेंद्र मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मात्र त्याच्या जाण्यानेे वृध्द आई, ३५ वर्षीय पत्नी आणि दोन चिमुकली मुले निराधार झाली असून ती आर्थिक संकटात सापडली आहे. देवेंद्रची पत्नी हेमलता मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाकडून मदत मिळावी यासाठी धडपड करीत आहे. बाहेरचे तेवढे ज्ञान नसल्यामुळे तिला सतत हेलपाट्या खावे लागत आहे. अशात घराचा खर्च भागविणे अडचणीचे होत आहे. नेशन फस्ट या सामाजिक संघटनेने काही दिवसांपूर्वी अन्नधान्याची या कुटुंबाला मदत केली. या संकटातून सावरण्यासाठी या कुटुंबाला मदत करण्यासाठी आणखी हात पुढे येण्याची गरज आहे.
.........
रितेशला परिस्थितीचा जाण पण हतबल
मोठा मुलगा नऊ वर्षाचा असून चौथ्या वर्गात शिकत आहे. तर लहान मुलगा दीड वर्षाचा झाला आहे. रितेेशला वडिलाचा मृत्यू झाला असून आपली जबाबदारी आता आईवर असल्याची बाब कळली आहे. पण चिमुकल्या वयात तो आपल्या कुटुंबासाठी काहीच करू शकत नाही.
.............
दारावर आवाज येताच येतो धावत
एक महिन्यापासून शौर्य सतत वडिलाचा शोध घेत घरात इकडे तिकडे फिरत असतो. दारावर कोणी आला की, आधी वडील आले असावे म्हणून धावत येतो. परंतु नवीन माणूस पाहताच तो गप्प होतो. दीड वर्षाच्या शौर्यला पाहून समाजात आणखी कितीतरी शौर्य असतील की त्यांचे बालपण वडिलाच्या प्रेमाला आणि लाडाला मुकत असावेत, वडिलांचा प्रेमळ हात डोक्यावरून फिरणे बंद होत असेल तर अशा मुलांचे भविष्य कसे घडेल हा विचार सतत मनाला बोचत असतो.