आता माता, शिशू मृत्यूदर कमी करणार सुमन प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:53 IST2021-02-06T04:53:33+5:302021-02-06T04:53:33+5:30
गोंदिया : माता आणि बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी व सुरक्षित संगोपनासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे सुमन प्रकल्प राबविण्यात येत आहे. ...

आता माता, शिशू मृत्यूदर कमी करणार सुमन प्रकल्प
गोंदिया : माता आणि बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी व सुरक्षित संगोपनासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे सुमन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा उपजिल्हा रुग्णालय आणि सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयाची निवड करण्यात आली. माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सुमन प्रकल्पाची मदत होणार आहे.
जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात आरोग्यविषयक सोयी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. परिणामी माता मृत्यू व नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. माता व नवजात बालकांच्या मृत्यूचा दर शून्यावर आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. आता सुमन प्रकल्पातंर्गत यावर काम केले जाणार आहे. यासाठी नुकतेचे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
त्यात आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी मार्गदर्शन केले. सुमन प्रकल्पासाठी गोंदिया जिल्ह्यातून उपजिल्हा रुग्णालय तिरोडा व ग्रामीण रुग्णालय सालेकसा यांची निवड करण्यात आली. बाळंतपणात होणाऱ्या मातामृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी व सुरक्षित मातृत्वाची हमी घेण्यासाठी गोंदियासारख्या आदिवासी व दुर्गम क्षेत्रात नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. जिल्हा गुणवत्ता अभिवचन समिती या सुमन प्रकल्पावर देखरेख ठेवणार असून याचे नियमित मूल्यमापन करणार आहे. चोवीस तास तज्ज्ञांमार्फत सुरक्षित मोफत बाळंतपण व अत्यावश्यक शस्त्रक्रिया असे याचे स्वरूप आहे. यात प्रशिक्षित प्रसूती तज्ज्ञांचा सहभाग घेतला जाणार आहे. महिलांना मोफत सुलभ प्रसूती सेवा मिळण्यास अडचण आल्यास १०४ कॉल सेंटरवर तक्रार नोंदणी, कॉल करता येणार आहे. तसेच राज्य पातळीवरून समस्याचे निराकरण केले जाणार आहे. यात प्रसूती रुग्ण महिलेकडे व सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अर्बन माता बालसंगोपन अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
......
जिल्हा टास्क फोर्सची स्थापना करणार
सुमन प्रकल्पाची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना केली जाणार आहे. ब्लॉक लेवलवर नियंत्रण करण्यासाठी तालुका सुकाणू समितीची स्थापना करण्यात येणार आहे. सुरक्षित मातृत्वाची हमी घेण्यासाठी आता सुमनच्या माध्यमातून गोंदिया जिल्हा तयारीस लागला आहे.
.......
टाेल फ्री क्रमांकावर करता येणार तक्रार
महिलांना मोफत सुलभ प्रसूती सेवा मिळण्यास अडचण आल्यास अथवा आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य न केल्यास त्यांना याची तक्रार १०४ टोल फ्री क्रमांकावर करता येणार आहे. याचे सनियंत्रण राज्यस्तरावरून केले जाणार असून तक्रारींची गांभीर्याने दखल घेवून संबंधितांवर वेळीच कारवाई केली जाणार आहे.