आता नागरिक सरसावले तर लसींचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST2021-07-05T04:18:41+5:302021-07-05T04:18:41+5:30
गोंदिया : जिल्ह्यात लसींचा साठा संपल्याने लसीकरणाला पूर्णपणे ब्रेक लागला होता. मात्र शुक्रवारी २६,६०० लसींचा पुरवठा होताच शनिवारी (दि.३) ...

आता नागरिक सरसावले तर लसींचा तुटवडा
गोंदिया : जिल्ह्यात लसींचा साठा संपल्याने लसीकरणाला पूर्णपणे ब्रेक लागला होता. मात्र शुक्रवारी २६,६०० लसींचा पुरवठा होताच शनिवारी (दि.३) थेट २१,४०८ नागरिकांनी लस घेतली आहे. यामुळे आता आरोग्य विभागाकडे सोमवारसाठी फक्त ५१९२ डोस उरले आहेत. यातून सोमवारी अर्धा दिवस लसीकरण होणार असून, त्यानंतर मात्र लसीकरण थांबवावे लागणार आहे. विशेष म्हणजे, सोमवारी लसींचा पुरवठा न झाल्यास मंगळवारी मात्र पुन्हा लसीकरणाला ब्रेक देण्याची वेळ येऊ शकते.
लसीकरणासाठी आतापर्यंत आरोग्य विभागाला नागरिकांची मनधरणी करण्याची गरज दिसून येत होती. शहरात याचे प्रमाण कमी असले तरी ग्रामीण भागात मात्र लसीकरणासाठी जनजागृती व घरोघर भेट देऊन नागरिकांना लसीकरणाबाबत समजावून त्यांना तयार करावे लागत होते. शिवाय जिल्ह्यात कित्येक ठिकाणी लसीकरण केंद्र देऊनही गावागावांत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. मात्र त्यानंतरही नागरिक शिबिरात जाऊन लस घ्यायला तयार नसल्याचे दिसून आले. मात्र कोरोना लस घेतल्यानंतरच आपण सुरक्षित राहू शकतो याबाबत वृत्तपत्र व टीव्हीवरील माहितीमुळे नागरिकांत आता लसीकरणाला घेऊन जागृती आली आहे. यामुळेच आता जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिक सरसावत असल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे मात्र आता लसींचा नियमित व जास्त प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरणाला ब्रेक द्यावा लागत असल्याचे प्रकार घडत आहेत. लसींचा साठा संपल्यामुळे गुरुवारी व शुक्रवारी असेच काहीसे घडले. मात्र शुक्रवारी लसींचा पुरवठा होताच शनिवारी (दि.३) तब्बल २१,४०८ नागरिकांनी लस घेतल्याची नोंद आहे. म्हणजेच, लसीकरणासाठी नागरिक आता स्वत: पुढे येत असल्याचे यातून दिसून येते.
----------------------------------
सर्वच गटातील नागरिकांची धाव
लसींचा पुरवठा झाल्यानंतर जिल्ह्यातील नागरिक आता जागरूक झाल्याचे दिसून आले आहे. कारण, शनिवारी तब्बल २१,४०८ नागरिकांनी लस घेतली असून, यामध्ये सर्वच गटातील नागरिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, शनिवारी १८-४४ गटात सर्वाधिक १५,७२० तरुणांनी लस घेतली असून, ४५-६० गटात ४२०३ तर ६० प्लस गटात १४७५ नागरिकांनी लस घेतली आहे. आता जिल्ह्यात ४,६१,८८४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
-------------------------------
अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे यंत्रणा हतबल
शुक्रवारी मिळालेल्या २६,६०० डोसेसमधून शनिवारी २१,४०८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. म्हणजेच, आरोग्य विभागाकडे आता ५१९२ डोस उरले असून, शनिवारचे आकडे बघता सोमवारी यातून अर्धा दिवसच लसीकरण करता येणार आहे. अशात सोमवारी लसींचा पुरवठा न झाल्यास मात्र मंगळवारी जिल्ह्यात पुन्हा लसीकरणाला ब्रेक देण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आता नागरिकांना लस हवी असताना लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे.