आता पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना अच्छे दिन
By Admin | Updated: August 26, 2015 01:51 IST2015-08-26T01:51:27+5:302015-08-26T01:51:27+5:30
पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुट्टीच्या दिवशी कर्तव्य पार पाडल्यास देण्यात येणाऱ्या भत्यात वाढ करण्यात आली आहे.

आता पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना अच्छे दिन
दैनिक भत्त्यात वाढ : साप्ताहिक सुटीचा मोबदला
आंधळगाव : पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुट्टीच्या दिवशी कर्तव्य पार पाडल्यास देण्यात येणाऱ्या भत्यात वाढ करण्यात आली आहे.
पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना गणेशोत्सव, ईद, नवरात्र, दिवाळी, शारदोत्सव व राजकीय स्तरावरील महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा, व्यवस्था व जिल्ह्यात विविध शहर व व्हिआयपी बंदोबस्ताकरीता कर्तव्याचा कालावधी हा बऱ्याचदा १२ तासाचा अथवा त्यापेक्षा जास्त काळ बंदोबस्तात घालवावा लागतो. अपूऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्या नेहमी रद्द केल्या जातात. आता त्यांना साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या भत्त्यांमध्ये वाढ करणारा निर्णय राज्य शासनाच्या गृहविभागाने ६ आॅगस्ट रोजी एका आदेशान्वये घेतला आहे.
राज्यातील वाढती लोकसंख्या, वाढते शहर, औद्योगिक कारभार तसेच राज्यातील विविध धार्मिक उत्सव, सणासह आदी बऱ्याच सांस्कृतिक, राजकीय, विविध समाजाचे सांस्कृतीक कार्यक्रम, महापुरूषांच्या जयंती, अनुचित घटना घडल्यास ठेवण्यात आलेला बंदोबस्तात पोलीसांसह वरिष्ठ अधिकारी यांना या कामाकरिता कर्तव्य बजावावे लागतात. त्यामुळे १२ तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ पोलीस यंत्रणा सज्ज असते. त्यासाठी त्यांच्या सुट्या सुद्धा रद्द केल्या जातात. गृह विभागाच्या जुलै २००४ च्या आदेशान्वये पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात वेतनश्रेणीनुसार दैनिक भत्ता अल्प प्रमाणात दिला जातो. त्याकरीता आता शासनाने त्यात सुधारणा करून दैनिक भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.