आता प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्र तपासणी
By Admin | Updated: October 18, 2014 23:27 IST2014-10-18T23:27:45+5:302014-10-18T23:27:45+5:30
डोळ्यांचा आजार किंवा नेत्रसंबधी समस्या असलेल्या लोकांना एखाद्या नेत्र शिबिराची वाट पाहावी लागते. आर्थिकदृष्ट्या सबल लोक आपली नेत्रसंबंधी समस्या सोडविण्यासाठी खासगी नेत्र चिकित्सकाकडून

आता प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्र तपासणी
सालेकसा : डोळ्यांचा आजार किंवा नेत्रसंबधी समस्या असलेल्या लोकांना एखाद्या नेत्र शिबिराची वाट पाहावी लागते. आर्थिकदृष्ट्या सबल लोक आपली नेत्रसंबंधी समस्या सोडविण्यासाठी खासगी नेत्र चिकित्सकाकडून तपासणी करून घेतात. परंतु आता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात महिन्यातून एक वेळा नेत्र तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. याचा थेट लाभ गरीब व गरजू लोकांना मिळणार आहे.
गरीब आदिवासी व मागासलेल्या लोकांना नेत्र समस्यांच्या आजारापासून मुक्त करण्याच्या हेतूने गोंदिया जिल्ह्याचे मुख्य कार्यपालन अधिकारी डी.डी. शिंदे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांच्या निर्देशान्वये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात महिन्यातून किमान एकदा नेत्र तपासणी व औषधोपचार व गरज भासल्यास शस्त्रक्रिया कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
सालेकसा तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक अनंतवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सालेकसा तालुक्यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्र तपासणीचे दिवस ठरविण्यात आले आहेत.त्याप्रमाणे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्र तपासणी करण्यात येईल. यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारला प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध, दुसऱ्या शुक्रवारला प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव, तिसऱ्या शुक्रवारला प्राथमिक आरोग्य केंद्र बिजेपार आणि चौथ्या शुक्रवारला प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथे नेत्र तपासणी करण्यात येईल. सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयाचे नेत्र चिकीत्सा अधिकारी आर.ए. जांगडे हे तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहून नेत्र तपासणी, भिंग तपासणी, मोतियाबिंदू व काच तपासणी करतील. गरजूंवर औषधोपचार केला जाईल. ज्या रुग्णांना डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याची गरज असेल त्यांना संदर्भीत करण्यात येईल.
ठराविक दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आपल्या अधिनस्थ कार्यक्षेत्रातील नेत्र समस्यांशी सबंधीत रुग्णांना तपासणीकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना ठराविक दिवशी तपासणी करीता प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात येईल. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीकरिता ठरविण्यात आलेल्या दिवसाची कार्यक्षेत्रात प्रचार व प्रसिध्दी करण्यात येईल. याची माहिती कार्यक्षेत्रातील जनतेला होईल व सबंधीत रुग्ण तपासणीच्या दिवशी आवर्जून तपासणी करीता उपस्थित राहील.
सदर तपासणीसाठी नियोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक अनंतवार यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधिकारी डॉ. चिमणे, डॉ. देवकाते, डॉ. रघटाटे, डॉ. रायपूरे, डॉ. चाटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. (प्रतिनिधी)