हे कोविड केअर सेंटर नव्हे, तर कोरोना संसर्गाचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST2021-04-23T04:31:38+5:302021-04-23T04:31:38+5:30
गोंदिया : येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोविड केअर कक्ष सुरू करण्यात आले. कोरोनामुळे जिकडे-तिकडे स्वच्छता ठेवा असा गाजावाजा केला जात ...

हे कोविड केअर सेंटर नव्हे, तर कोरोना संसर्गाचे केंद्र
गोंदिया : येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोविड केअर कक्ष सुरू करण्यात आले. कोरोनामुळे जिकडे-तिकडे स्वच्छता ठेवा असा गाजावाजा केला जात असताना स्वच्छतेसंदर्भात जे विभाग ओरडून सांगत होते त्याच्या विभागाची स्थिती दिव्याखालीच अंधार यासारखी आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वॉर्ड क्रमांक ३ येथील कोविड वॉर्डातच घाणीचे साम्राज्य आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात कोविड रुग्णांच्या देखरेख व उपचारांसाठी वॉर्ड तयार करण्यात आले. बेसिंगमध्ये घाण पडलेली आहे. तेथील पाणी वापरता येत नाही. त्याच वार्डात कचऱ्याचे प्लास्टिक बकेट ठेवण्यात आले आहेत; परंतु त्या ८ ते १० प्लास्टिक बकेट सर्व केरकचऱ्याने भरून पडल्या आहेत. बाथरूममध्ये रुग्णांना लघुशंका करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ठिकाणी घाण पसरली आहे. शाैचालयदेखील घाण अवस्थेत आहे. कोविड रुग्णांच्या वार्डात जागोजागीही घाण पसरली असल्याने हे कोविड केअर सेंटर की कोरोना संसर्गाचे केंद्र आहे हेच सांगणे कठीण आहे. वार्डाच्या बाहेरही डॉक्टर व परिचारिकांनी रुग्णाच्या उपचाराच्या वेळी वापरलेले कापड वार्डाच्या बाहेर तसेच टाकून ठेवले आहे. सर्वसामान्यांना अमूक करा, तमूक करा असे सांगणारा आरोग्य विभाग बेजबाबदारपणाने वागत आहे. याकडे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे यांनी लक्ष देण्याची गरज आहे.