शाळांमधून एकही विद्यार्थी पॉझिटिव्ह नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST2021-02-07T04:27:36+5:302021-02-07T04:27:36+5:30

केशोरी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील नववी ते बारावी वर्गापर्यंतचे शाळा-महाविद्यालय २३ नोव्हेंबरपासून तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या ...

None of the students from the schools are positive | शाळांमधून एकही विद्यार्थी पॉझिटिव्ह नाही

शाळांमधून एकही विद्यार्थी पॉझिटिव्ह नाही

केशोरी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील नववी ते बारावी वर्गापर्यंतचे शाळा-महाविद्यालय २३ नोव्हेंबरपासून तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, शहराप्रमाणे ग्रामीण भागातीलसुद्धा शाळा-महाविद्यालय घाबरत-घाबरत कोरोना संसर्गाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत शाळा सुरू झाल्या आहेत. आता १० दिवसांचा कालावधी लोटला असून एकही विद्यार्थी शाळांमधून कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. यामुळे कोरोनाला हरविण्यात शाळा प्रशासनासह शिक्षक यशस्वी ठरले आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याने शासनाने लॉकडाऊन शिथिल करून शिक्षणाची दारे उघडी करण्याचा निर्धार घेतला. २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गासह आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवी वर्गासह शाळा-महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे या आदिवासी व ग्रामीण भागातील शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. शासनाने वेळोवेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत पूर्ण आवश्यक सोयीसुविधांसह शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात आले आहेत. विज्ञान, गणित व इंग्रजी हे विषय शिकविण्यासाठी अधिक भर दिल्यामुळे या विषयाच्या शिक्षणामुळे विद्यार्थी समाधान व्यक्त करीत आहेत.

सध्या जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख लक्षात घेता दहशत कायम असून अजूनही विद्यार्थ्यांची उपस्थिती १०० टक्के दिसून येत नाही. मात्र, शाळा सुरू होऊन १० दिवसांचा कालावधी संपला असून शाळांमधून एकही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. त्यामुळे शाळा प्रशासनासह मुख्याध्यापक, प्राध्यापक व शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरदिवशी थर्मल स्क्रिनिंग व ऑक्सिजन तपासणी प्राधान्याने होत असल्याने शिक्षक कोरोना हटविण्यात यशस्वी ठरले आहेत. वर्गात फक्त तीन विषयांची शिकवणी होत असून एका विद्यार्थ्यांमध्ये किमान तीन फुटांचे अंतर ठेवून बैठक व्यवस्था केली आहे. एकत्र जेवण व खेळांना मनाई आणि पहिल्या दिवसापासून कोरोना नियमावलीचे पालन करण्याविषयी दररोज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, मास्कचा वापर इत्यादी गोष्टी कोरोनाला हरविण्यात कारणीभूत ठरल्या आहेत, हे विशेष.

Web Title: None of the students from the schools are positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.