तंटामुक्त समितीचे गठन झालेच नाही
By Admin | Updated: October 15, 2014 23:21 IST2014-10-15T23:21:02+5:302014-10-15T23:21:02+5:30
दरवर्षी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड करुन एक तृतीयांश सदस्यांची फेरनिवड करण्यासाठी ग्रामसभा आयोजित केली जाते. मात्र गोेरेगाव तालुक्यातील ग्राम सटवा व डव्वा येथे शासनाच्या

तंटामुक्त समितीचे गठन झालेच नाही
गोंदिया : दरवर्षी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड करुन एक तृतीयांश सदस्यांची फेरनिवड करण्यासाठी ग्रामसभा आयोजित केली जाते. मात्र गोेरेगाव तालुक्यातील ग्राम सटवा व डव्वा येथे शासनाच्या या नियमाला ग्रामसेवक येडे यांच्याकडून तिलांजली देण्यात आली असून सप्टेंबर महिना लोटला तरी अद्याप तंटामुक्त समितीचे गठन करण्यात आले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे समितीचे सदस्य व पदाधिकारी संभ्रमात आहेत.
गावातील नागरिकांचे तंटे गावात समोपचाराने सोडविण्यात येऊन पोलीस स्टेशन व कोर्टाच्या पायऱ्या चढविण्यापासून नागरिकांना वाचविण्याच्या उदात्त हेतूने राज्य शासनाच्यावतीने महात्मा गांधी तंटामुक्त मोहिम राबविली जात आहे. राज्यात अत्यंत प्रभावी ठरलेली ही मोहिम आता लोकचळवळ झाली आहे. गावातील तंटे, आंतरजातीय विवाह, धार्मिक सण, उत्सव यामध्ये तंटामुक्त मोहिमेची भूमिका अत्यंत महत्वाची ठरत असल्याने आजघडीला तंटामुक्त मोहीम प्रत्येक गावात अत्यंत प्रभावीपणे राबविली जाते.
निकषाप्रमाणे दरवर्षी या समितीचे गठन करण्यात येत असून दरवर्षी या समितीच्या अध्यक्षाची तसेच समितीतील एक तृतीयांश सदस्यांची निवड करायची असते. त्यानुसार १५ ते ३० आॅगस्ट दरम्यान आयोजित ग्रामसभेमध्ये या समितीचे गठन वा पुनर्गठन केले जाते. मात्र गोेरेगाव तालुक्यातील ग्राम सटवा व डव्वा येथे ग्रामसेवक येडे यांच्या हलगर्जीपणामुळे अजुनही तंटामुक्त समितीचे गठन झालेले नाही.
विशेष म्हणजे, दोन्ही गावे तंटामुक्त गाव म्हणून पुरस्कृत झाली असली तरी ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे यावर्षी ही गावे नवीन समितीपासून वंचित झाली आहेत. यासंबंधात ग्रामसेवक येडे यांना विचारणा केली असता, आचारसंहितेचे कारण पुढे करण्यात आले. मात्र आचारसंहिता ही १२ सप्टेंबरपासून लागू झाली असून समिती १५ आॅगस्ट ते ३० आॅगस्टदरम्यान का गठीत केली नाही? असा प्रश्न केला असता ग्रामसेवक येडे मात्र निरुत्तर झाले. एकंदरीत ग्रामसेवकाच्या मनमर्जी कारभार व हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे स्पष्ट असून ग्रामसेवकावर करवाई करावी, अशी मागणी नागरिकांची आहे. (तालुका प्रतिनिधी)