मानवी जीवाच्या विषयावर राजकारण नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST2021-03-31T04:29:37+5:302021-03-31T04:29:37+5:30
गोंदिया : गतवर्षीच्या लॉकडाऊनच्या कडू आठवणी सगळ्यांच्याच स्मरणात आहेत. दिवसाचे लॉकडाऊन परवडण्यासारखे नाही. गरीब, गरजू, लघू व मध्यम व्यापारी ...

मानवी जीवाच्या विषयावर राजकारण नको
गोंदिया : गतवर्षीच्या लॉकडाऊनच्या कडू आठवणी सगळ्यांच्याच स्मरणात आहेत. दिवसाचे लॉकडाऊन परवडण्यासारखे नाही. गरीब, गरजू, लघू व मध्यम व्यापारी व जनतेचे हित आणि सुरक्षिततेची भावना लक्षात घेता रात्रीच्या लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्यात आला. रोज कोविडच्या हजारो चाचण्या होत आहे. भाजपशासित राज्यात चाचण्या नगण्य आहेत. विरोधक मात्र मानवी जीवाच्या विषयावर राजकारण करीत असून लोक मरताहेत तर मरू द्या, या भूमिकेत असल्याचा, घणाघाती आरोप महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
मंगळवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजता विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार आनंदराव वंजारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, प्रदेश महासचिव जिया पटेल, माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, मनोज बागडे, प्रशांत देशकर, धनराज साठवणे, अजय गडकरी आदी उपस्थित होते. नाना पटोले म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी निर्णय घेतले जात आहेत. शेतकऱ्यांचे शेकडो पोती धान मिलिंगच्या प्रतीक्षेत आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रेशरमुळे धानाचे मिलिंग करता आले नाही. आताही अनेक शेतकऱ्यांकडे धान शिल्लक आहे. धानाची उचल करण्यासाठी मुदतवाढीसंदर्भात मागणी केली आहे. तांदळाच्या उताऱ्यासंदर्भातही केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे घोषित करण्यात आलेला प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस एप्रिलमध्ये देण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रियाही सुरू झाली आहे. राज्यात कर्मचारी पदभरती संदर्भातही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तिन्ही पक्षांचे महाविकास आघाडी सरकारचे काम ऑलवेल सुरू आहे, मात्र विरोधक नाहक आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गतवर्षी घोषित करण्यात आलेल्या २० लाख कोटींचे पॅकेजचे काय झाले, याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. कुणाच्याही खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. फक्त घोषणा व जुमलेबाजी देऊन वेळ मारून नेण्यात आल्याचा टोलाही पटोले यांनी लगावला. दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणात जो कोणी अधिकारी दोषी असेल त्यावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे, अशी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.
बॉक्स
मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही
वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार या संदर्भात प्रश्न उपस्थित केला असता नाना पटोले म्हणाले, वीज ग्राहकांना कुठलीही सुविधा व त्रास निर्माण होता कामा नये, या मताचे आम्ही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विजेच्या देयकाचा भरणा केल्यास त्यापोटी वीज वितरण कंपनीला तोटा कमी प्रमाणात सहन करावा लागेल. मात्र आपण ऊर्जा खात्याच्या संदर्भात मंत्रिपदाच्या कुठल्याही शर्यतीत नाही. मी स्वतः प्रदेशाध्यक्ष असल्याने केव्हाही मंत्रिपद मला मिळू शकते, मात्र आपण त्या संदर्भात कुठलाही विचार केलेला नाही किंवा आपण कुठल्याही शर्यतीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.