न. प. निवडणुुकीसाठी उमेदवारांची शोधाशोध
By Admin | Updated: July 27, 2016 02:18 IST2016-07-27T02:18:15+5:302016-07-27T02:18:15+5:30
नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात गडचिरोली व देसाईगंज या दोन नगर पालिकांची निवडणूक होऊ घातली आहे.

न. प. निवडणुुकीसाठी उमेदवारांची शोधाशोध
पाच महिन्यांपूर्वीच कसरत : अनेकांचे राजकीय पक्षात होणार प्रवेश
गडचिरोली : नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात गडचिरोली व देसाईगंज या दोन नगर पालिकांची निवडणूक होऊ घातली आहे. गडचिरोली येथे २५ तर देसाईगंज येथे १८ वॉर्डांसाठी निवडणूक होणार आहे. या वॉर्डांचे आरक्षण जाहीर झाल्याने तेथील जागेवर उभा करावयाच्या उमेदवाराचा शोध राजकीय पक्ष व आघाड्यांकडून सध्या सुरू झाला आहे.
गडचिरोली शहरात २५ वॉर्डांमध्ये महिला, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग आदी प्रवर्गातील उमेदवार लागणार आहे. त्यादृष्टीने काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांनी उमेदवार शोधणे सुरू केले आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचे सभापती अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या आघाडीनेही उमेदवारांची शोधाशोध चालविली आहे. गतनिवडणुकीत युवाशक्तीच्या नावावर अपक्ष निवडून आलेल्या गडचिरोलीच्या नगराध्यक्ष डॉ. अश्विनी यादव-धात्रक यांनी शिवसेनेचे शिवबंध हाताला बांधले आहे. त्या शिवसेनेकडून मैदानात राहतील. तर त्यांच्याच सहकारी सुषमा राऊत यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. देसाईगंज येथेही कल्पना माडावार यांनी शिवसेनेत व गडचिरोली येथे संजय मेश्राम यांनी युवाशक्तीतून भाजपात प्रवेश केला आहे. युवाशक्तीचे आणखी काही नगरसेवक विविध राजकीय पक्षात जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)