‘नो हेल्मेट’ तरीही पेट्रोल

By Admin | Updated: July 23, 2016 23:56 IST2016-07-23T23:56:11+5:302016-07-23T23:56:11+5:30

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून रस्ते सुरक्षा समितीने दुचाकीस्वारांना हेल्मेट घालने बंधनकारक केले असून...

'No helmet' still petrol | ‘नो हेल्मेट’ तरीही पेट्रोल

‘नो हेल्मेट’ तरीही पेट्रोल

गोंदिया : रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून रस्ते सुरक्षा समितीने दुचाकीस्वारांना हेल्मेट घालने बंधनकारक केले असून ‘नो हेल्मेट-नो पेट्रोल’ असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र जिल्ह्यात शासनाच्या या निर्णयाला धुकडावून हेल्मेट नसलेल्यांनाही पेट्रोल दिले जात असल्याचे शनिवारी (दि.२३) दिसले. विशेष म्हणजे या निर्णयामुळे वाहनधारकांत रोष व्याप्त असून काही पेट्रोलपंप संचालकांनीही याचा विरोध दर्शविला.
वाहनांची वाढती संख्या, त्यातच बेपर्वाईने भरधाव वेगात वाहन चालविण्यात येत असल्याच्या प्रकारांमुळे रस्ते अपघातांची संख्या वाढत चालली आहे. ही बाब लक्षात घेत रस्ता सुरक्षा व अपघातांना आळा घालण्यासाठी दुचाकीचालक व मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी या निमयाची सक्तीने अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते.
त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून रस्ते सुरक्षा समितीने मोटारवाहन कायद्याचे काटेकोर पालन करण्यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक करीत दुचाकीवरील चालक व मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातले नसल्यास त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल न देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने तसे परिपत्रक काढले आहे.
मात्र असे असतानाही शहरासह जिल्हयात शासनाच्या या निर्णयाला धुडकावून लावले जात असल्याचे दिसले. शनिवारी शहरातील पेट्रोलपंपांवर हेल्मेट नसलेल्यांनाही पेट्रोल दिले जात असल्याचे चित्र बघावयास मिळाले. हेल्मेट शिवाय पेट्रोल भरण्याचा हाच प्रकार जिल्ह्यातील अन्य ठिकाणांवरही दिसून आला.
यातून राज्य शासनाच्या या निर्णयाचे वाहनधारक व पेट्रोलपंप संचालकांकडून स्वागत केले जात नसल्याचे दिसून येते. परिणामी शासनाच्या या निर्णयाला बगल देत ‘नो हेल्मेट’ तरिही पेट्रोल ही स्थिती अवघ्या जिल्ह्यात शनिवारी दिसून आली. (शहर प्रतिनिधी)

हेल्मेट सक्ती पण रस्त्यांचे काय
हेल्मेट सक्तीच्या या निर्णयाचा वाहनधारकांकडून स्पष्ट विरोध दर्शविण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर शासन आपली मर्जी जनतेवर लादत असल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. विशेष म्हणजे, शासनाने आपल्या मर्जीने हेल्मेट सक्ती करीत आता पेट्रोलसाठीचे बंधन लावले आहे. अपघातांवर आळा घालण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जात असतानाच शहरातील खराब रस्त्यांमुळे अपघात घडत नाहीत काय असा सवालही वाहनधारक करीत आहेत.
पेट्रोलपंप
चालकही नाराज
हेल्मेट सक्तीच्या निर्णयाचे जिल्ह्यातील काही पेट्रोलपंप संचालकांनी स्वागत केले. तर काहींनी राज्य शासनाच्या या निर्णयाप्रती नाराजी दर्शविली. हेल्मेट सक्तीने वाहनधारक अडचणीत येत असतानाच पेट्रोलपंप संचालकांवर शासनाने जबरन हा निर्णय लादत असल्याचेही काहींनी बोलून दाखविले. याबाबत आपल्या असोसिएशनशी चर्चा करून त्यानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचेही बोलून दाखविले.

 

Web Title: 'No helmet' still petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.