ना धाक, ना दरारा
By Admin | Updated: May 17, 2015 01:46 IST2015-05-17T01:46:11+5:302015-05-17T01:46:11+5:30
कोणताही अवैध धंदा हा आडमोडीच्या वळणाने केला जातो. लपून-छपून, इतरांच्या लक्षात येणार नाही,

ना धाक, ना दरारा
बोंडगावदेवी : कोणताही अवैध धंदा हा आडमोडीच्या वळणाने केला जातो. लपून-छपून, इतरांच्या लक्षात येणार नाही, अशा आडमार्गावर केला जातो. परंतु येथे तर मुख्य चौकात, रहदारीच्या मुख्य मार्गावर खुलेआम मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीने सध्या जत्रेचे स्वरूप पहायला मिळत आहे. आम्हीच या गावचे मालक आहोत, अशा आवेशात अवैध दारू विक्री करणाऱ्यांची सध्या विरूगीरी दिसून येत आहे.
दिवसेंदिवस भौगोलिकदृष्ट्या गावाचा विस्तार वाढत आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढत आहे. गावातून अड्याळ-चान्ना-चिचगड हा २७७ क्रमांकाचा राज्य मार्ग, बोंडगावदेवी-बाराभाटी-अर्जुनी हा ३६ क्रमांकाचा प्रमुख जिल्हा मार्ग जातो. या तिन्ही गर्दीेच्या मार्गावरच अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी आपले कायमस्वरूपी बस्तान मांडल्याचे दिसत आहे. गावातील ऐन मुख्य चौकातून सहजरीत्या देशी-दारू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याचे बोलल्या जाते.
ज्या ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू आहे, ते ठिकाण मुख्य चौक म्हणून ओळखल्या जाते. गावामधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच सहजरीत्या दारू उपलब्ध होत असल्याने चौकात गर्दीचे स्वरूप येऊन जत्रेचा देखावा निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोकांच्या आवागमनाच्या मुख्य रस्त्यावर अवैध दारू विक्रीने कमालीचा कहर केल्याने भर रस्त्यावर मद्यपी व बघ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. मद्यपींच्या घोळक्यांनी रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. मद्यपी शौकीन बाजारांच्या भाऊगर्दीने सदर मार्गावर केव्हा अपघात होईल याची शाश्वती नाही. परंतु अशा मुख्य रस्त्यावरील अवैध दारू विक्री प्रकाराने अपघातास निमंत्रण मिळत आहे, असे चौकात अनेकांच्या तोंडातून बोलल्या जात आहे.
बऱ्याच दिवसांपासून अवैध दारू विक्रीचा गोरखधंदा राजरोसपणे मुख्य चौकात बिनबोभाट सुरू आहे. शेजारी राहणाऱ्या इतर सामान्य नागरिकांना मात्र मद्यपी शौकिनांपासून कमालीचा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. अवैध दारू विक्रेत्यांचा मुजोरीपणा दिवसेंदिवस संबंधित विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वाढत आहे. मोठ्या ऐटीत राहून दारू विक्रीच्या व्यवसायात गुंतलेल्यांना ना धाक, ना दरारा असे दिसून येत आहे.
मोजक्या लोकांवर आळा बसविणे दुरापास्त झाले, असे नाईलाजास्तव गावकऱ्यांत बोलल्या जाते. अनेक बेवळे रस्त्यावर नाचत कुणी घराची तर कुणी गावची वाट धरतो. गावात खुलेआम दारू विक्री बिनधिक्कतपणे सुरू असून पोलीस विभाग तोंडात गोटे घालून मुकसंमती देत असल्याचे दिसते. (वार्ताहर)