चिल्लर नाही, चॉकलेटच घ्या

By Admin | Updated: May 25, 2015 01:20 IST2015-05-25T01:20:20+5:302015-05-25T01:20:20+5:30

शहरातील अनेक दुकानांमध्ये चिल्लरवरून वाद होताना आपण नेहमी पाहतो.

No chillers, take chocolate | चिल्लर नाही, चॉकलेटच घ्या

चिल्लर नाही, चॉकलेटच घ्या

गोंदिया : शहरातील अनेक दुकानांमध्ये चिल्लरवरून वाद होताना आपण नेहमी पाहतो. कारण दुकानदार आणि ग्राहकांचा पुन्हा संबंध येणार नसतो आणि इमेजचाही प्रश्न नसल्यामुळे असे प्रकार घडतात; पण महाविद्यालयात असे प्रकार घडत नाहीत. त्यामुळे कॉलेज परिसरातील कँटीनचालक त्याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांना चिल्लर न देता टोकन अथवा चॉकलेट देऊन आपला फायदा आणि विद्यार्थ्यांची लूट करीत आहेत, असा प्रकार 'तेरी भी चूप मेरी चूप' या पद्धतीने सुरू आहे.
शहरातील बहुतांश दुकानांतून कोणत्याही वस्तू घेतल्यास चिल्लर मागितली जाते. ग्राहकाने आठ रुपयांची वस्तू खरेदी केल्यास दोन रुपये परत न करता त्याऐवजी दोन रुपयांचे दोन चॉकलेट अथवा टोकन दिले जाते. विशेषत: मोबाईल रिचार्ज करणारे, अशी युक्ती वापरताना दिसून येतात. एखाद्या ग्राहकाने चिल्लर देण्याची मागणी केल्यास त्यालाच चिल्लर आणून द्या, असे सांगितले जाते. काही विक्रेते तर ग्राहकांसोबत चिल्लर देण्यावरून वाद घालत असतात. आमच्याकडे चिल्लर बनविण्याचा कारखाना आहे काय, असा प्रतिप्रश्न ग्राहकालाच करतात. महाविद्यालयात कँटीनमध्ये चिल्लरवरून वाद घातल्यास मित्र-मैत्रिणी काय म्हणतील, या भीतीमुळे तरुण चिल्लर मागत नाहीत. त्याचा फायदा कँटीनचालक घेत आहेत. कँटीनमध्येच नाही तर महाविद्यालयाच्या परिसरात असणाऱ्या हॉटेल आणि पानटपऱ्यांमध्ये चिल्लर न देता टोकन दिले जात आहेत.
विशेष म्हणजे चिल्लर पैसे असतानाही विद्यार्थ्यांची लूट केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या लुटीमागचे कारण विद्यार्थ्यांनी दुसऱ्या हॉटेल, टपरीवर जाऊन खरेदी करू नये म्हणून काही व्यावसायिक मुद्दाम टोकन देतात. विद्यार्थी टोकन जवळ असल्यामुळे पुन्हा त्याच हॉटेल अथवा पानटपरीवर जातात, अशा प्रकारे दुकादारांचा ग्राहक इतरत्र जाक नसून त्यांचा फायदा होतो. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: No chillers, take chocolate