तंटामुक्त समित्यांनी मिटविले नऊ लाख फौजदारी तंटे

By Admin | Updated: September 4, 2014 23:54 IST2014-09-04T23:54:37+5:302014-09-04T23:54:37+5:30

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेंतर्गत राज्यात सामोपचाराने मिटविण्यात आलेल्या तंट्यामध्ये सर्वाधिक प्रमाण फौजदारी स्वरूपाच्या तंट्याचे आहे. सर्वात कमी प्रमाण महसूली तंट्याचे आहे.

Ninety lakh criminal offenses erupted by non-communal groups | तंटामुक्त समित्यांनी मिटविले नऊ लाख फौजदारी तंटे

तंटामुक्त समित्यांनी मिटविले नऊ लाख फौजदारी तंटे

गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेंतर्गत राज्यात सामोपचाराने मिटविण्यात आलेल्या तंट्यामध्ये सर्वाधिक प्रमाण फौजदारी स्वरूपाच्या तंट्याचे आहे. सर्वात कमी प्रमाण महसूली तंट्याचे आहे. सुरूवातीपासून तब्बल नऊ लाख ११ हजार ४१९ फौजदारी तर ३३ हजार ३९९ महसूली स्वरूपाचे तंटे मिटविण्यात आले आहे. शिवाय दिवाणी स्वरूपाचे ६८ हजार २५५ तंटे मिटले आहेत. सामोपचाराने मिटणाऱ्या तंट्यामुळे न्यायालयांवरील भार हलका झाला आहे, असे गृहखात्याने आपल्या अहवालात जाहीर केले. तंटामुक्त गाव मोहीम यशस्वी ठरल्याचा दावाही केला आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम १५ आॅगस्ट २००७ पासून सुरू झाली. त्यानंतर संपूर्ण मोहीम महाराष्ट्रात एक चळवळ म्हणून उभी राहीली आहे. पैसा आणि वेळेची बचत करू शकणाऱ्या या तंटामुक्त गाव मोहीमेचे सर्वानीच स्वागत केले आहे. मोहीम यशस्वीपणे राबविली गेली.गावागावात तंटामुक्त गाव समित्या स्थापन झाल्या आहेत. तंटे गावातल्या गावात मिटू लागल्याने तंटामुक्त गाव समितीला गावात मानाचे स्थान मिळू लागले आहे. वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले दावेही तंटामुक्तीच्या माध्यमातून सुटू लागले आहे. त्यामुळे तंटामुक्त गाव मोहीमेची संकल्पना सर्वानाच पटली. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे सध्या सहावे वर्ष सुरू आहे. तत्पूर्वी प्रारंभीच्या चार वर्ष मिटलेल्या तंट्याची आकडेवारी गृहखात्याने जाहीर केली आहे. या चार वर्षाचा आढावा घेतल्यास सामोपचाराने मिटणाऱ्या तंट्यामुळे न्यायालयावरील भार काही अंशी हलका झाल्याचे गृहखात्याच्या लक्षात आल्याचेही म्हटले आहे. गावामध्ये अस्तित्वात व नव्याने निर्माण होणारे तंटे सामोपचाराने मिटविण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत आतापर्यंत एकूण १० लाख ७५ हजार ५३१ वेगवेगळया स्वरूपाचे तंटे मिटविण्यात यश मिळाले आहे. या मोहिमेत फौजदारी प्रक्रिया संहीता १९७३ कलम ३२० मध्ये नमूद केलेले दखलपात्र गुन्हे मिटवता येतात. तसेच अदखलपात्र गुन्हेही मिटविता येतात. याशिवाय महसूली, दिवाणी व इतर तंटे सामोपचाराने मिटविण्याची विशिष्ट कार्यपध्दती निश्चित करून देण्यात आली आहे. आजपर्यंत या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागात मिटलेल्या तंट्यामध्ये सर्वाधिक प्रमाण फौजदारी तंट्याचे असल्याचे दिसून येते.
मोहिमेच्या पहिल्या वर्षी म्हणजे २००७-०८ मध्ये २ लाख ७ हजार ११५ तंटे, २००९-१० मध्ये २ लाख १८ हजार ८१३ तंटे, तर २०१०-११ मध्ये २ लाख २५ हजार ३०२ व त्यांनतर एक लाखापेक्षा अधिक फौजदारी तंटे मिटविण्यात आले आहेत. याच कालावधीत दिवाणी स्वरुपाचे तंटे पहिल्या वर्षी २०,६६३, दुसऱ्या वर्षी १०,२२५, तिसऱ्या वर्षी १४,६९९ आणि चौथ्या वर्षी १६,८५७ तर महसुली स्वरूपाचे तंटे पहिल्या वर्षी ८,३४७, दुसऱ्या वर्षी ६,६५७, तिसऱ्या वर्षी ८,५५७ आणि चौथ्या वर्षी ९,८३८ सामोपचाराने मिटविण्यात आले आहेत. त्याशिवाय सहकार क्षेत्रातील २८,४९२ कामगार कार्यक्षेत्रातील १५,१८१, औद्योगिक क्षेत्रातील १३,२७२ आणि इतर ११,३०२ तंटे मिटविण्यात आले आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम सुरू झाल्यापासून गेल्या चार वर्षात ९ लाख ७५ हजार ५३१ तंटे मिटविण्यात आले. त्यात ९ लाख १८ हजार ४१९ फौजदारी तंटे मिटविण्यात आले आहे. वेळ, पैसा व त्रास वाचविण्याचे काम तंटामुक्त समितीने केले. मोहीमेने न्यायालयाचा कामाचा भार कमी केला. तंटामुक्त गाव मोहीम निश्चितपणे फलदायी ठरल्याचे तसेच ही मोहीम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे गृहखात्याने म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Ninety lakh criminal offenses erupted by non-communal groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.