पत्त्यांच्या डावाने घेतली नऊ पोलिसांची विकेट

By Admin | Updated: March 16, 2016 08:37 IST2016-03-16T08:37:04+5:302016-03-16T08:37:04+5:30

नक्षलविरोधी अभियान राबविताना मनोरंजन म्हणून पत्ते खेळणाऱ्या तसेच महत्वाच्या बंदोबस्ताचे काम करताना

Nine policemen took wickets on the leaves | पत्त्यांच्या डावाने घेतली नऊ पोलिसांची विकेट

पत्त्यांच्या डावाने घेतली नऊ पोलिसांची विकेट

गोंदिया : नक्षलविरोधी अभियान राबविताना मनोरंजन म्हणून पत्ते खेळणाऱ्या तसेच महत्वाच्या बंदोबस्ताचे काम करताना पत्त्यांचा नाद न सोडणाऱ्या सी-६० पथकातील ९ पोलीस जवानांना पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी गुरूवारी (दि.१०) निलंबित केले. मात्र एकीकडे त्यांचे निलंबन करण्यात आले असताना दुसरीकडे त्यांची नावे सांगण्यास टाळाटाळ करून पोलीस प्रशासनाने दुहेरी भूमिका वटविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महत्वाचा बंदोबस्त करतानाही पत्याच्या खेळात रमने ही बाब गंभीर मानली जाते. त्यामुळेच नक्षल शोधमोहीम राबवितानाही जंगलात बसून पत्ते खेळणाऱ्या पोलिसांना आपल्या कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले.
निलंबित झालेल्या पोलिसांमध्ये पोलीस हवालदार एकनाथ अत्तरगडे (बक्कल नं. १५६६), पोलीस शिपाई जीवन चव्हाण (बक्कल नं. ४५७), जसवंत रहांगडाले (बक्कल नं. १७६२), मिलींद नाकाडे (बक्कल नं. १७४९), वशीम अहमद पठाण (बक्कल नं. १४२८), वाहन चालक पोलीस हवालदार राधेश्याम कांबळे (बक्कल नं. १०८४), पोलीस शिपाई रामलाल वाघमारे (बक्कल नं. १७३९), नायक पोलीस शिपाई संजय अंबुले (बक्कल नं. २०४), फत्तेलाल मडावी (बक्कल नं. १५५५) यांचा समावेश आहे.
निलंबित झालेले पोलीस कर्मचारी गोंदियाच्या सी-६० दलात कार्यरत आहेत. नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल भागात काम करीत असताना व अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी या व्यक्तींवर असतानाही त्यांनी आपल्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
१६ जानेवारी २०१६ रोजी एसआरपीएफच्या कर्मचाऱ्यांच्या बदलीच्यावेळी गोंदियाच्या अत्तरगडे सी-६० पार्टीतील कर्मचारी झाशीनगर ते पळसगावध यादरम्यान ओपनिंग करीत होते. एसआरपीएफ कर्मचाऱ्यांच्या गाड्या निघून गेल्यानंतर आर.ओ. बंद करण्याच्या काही वेळापूर्वी जसवंत रहांगडाले, उपकमांडर फत्तेलाल मडावी, रामलाल वाघमारे, वशिम पठाण व मिलींद नाकाडे हे पत्ते खेळल्याचे पोलीस अधीक्षकांनी केलेल्या चौकशीतून निष्पन्न झाले. त्यानंतर याच अत्तरगडे पार्टीतील जवान ९ फेब्रुवारी रोजी मनोहरभाई पटेल जयंतीदिनी बिरसी विमानतळावर कार्यरत होते.
अभिनेता सलमान खान, झेड सुरक्षा असलेले खा.प्रफुल्ल पटेल व इतर नामवंत व्यक्तींच्या बंदोबस्तासाठी या पार्टीचा बंदोबस्त लावण्यात आला होता. बिरसी विमानतळावर आऊटर कॉर्डन व पॅनल सर्चिंगकरीता ते जवान होते. सलमान खान व पाहुण्यांचा ताफा बिरसी विमानतळावरून गोंदियाकडे निघाल्यानंतर त्या पाहुण्यांना यायला उशीर आहे असे गृहीत धरून या पार्टीतील कमांडर एकनाथ अत्तरगडे, जीवन चव्हाण, जसवंत रहांगडाले, वाहन चालक कांबळे, वाघमारे, अंबुले, उपकमांडर मडावी व दवनीवाडा येथून निलंबित झालेले कर्मचारी पोलीस शिपाई सोलंकी हे सर्व तासपत्ते खेळत होते. ही बाब पोलीस अधीक्षकांना कळल्यानंतर त्यांनी त्यांना निलंबित केले. (तालुका प्रतिनिधी)

पोलीस अधीक्षकांना बदनामीची काळजी
४एकीकडे पोलीस कर्मचाऱ्यांवरील आरोपांसाठी त्यांना निलंबित करणारे पोलीस अधीक्षक मंगळवारी मात्र या प्रकरणी माहिती देण्यास तयार नव्हते. त्या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. आता त्यांची नावे जाहीर करणे म्हणजे त्यांची नाहक बदनामी होईल, असे म्हणून त्यांनी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे देणे टाळले. त्यामुळे पोलीस अधीक्षकांना त्या कर्मचाऱ्यांची किती काळजी आहे, याची प्रचिती पत्रकारांना आली.

कमांडर भत्त्यासाठी प्रकार उघडकीस
४सी-६० च्या जवानांना कमांडर भत्ता मिळतो. या सी-६० दलातील एका वाहन चालकाला कमांडर भत्ता न मिळाल्याने त्याने बदला घेण्याच्या भावनेतून इतर कर्मचारी पत्ते खेळत असल्याची चित्रफित मोबाईलने बनवून पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहचविली अशी चर्चा आहे. परंतु नियमाप्रमाणे वाहन चालकांना कमांडर भत्ता नसतो, असेही बोलले जाते.
चित्रफीत काढणाऱ्यालाही निलंबित करा
४ज्या वाहन चालकाने ही चित्रफीत बनविली असेल त्यालाही निलंबित करा, अशी भावना काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. १६ जानेवारी २०१६ रोजी झाशीनगर ते पळसगाव यादरम्यान सी-६० चे पोलीस कर्मचारी आॅपरेशन करताना पत्ते खेळत होते तर वाहन चालकाला उभ्या असलेल्या वाहनाजवळच राहायला पाहिजे होते. तो चालक वाहन सोडून सी-६० पार्टीच्या मागे गेलाच कसा? त्या वाहन चालकानेही नियमबाह्य काम केले आहे. याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून त्याचेही निलंबन व्हायला पाहिले, अशी कुजबूज पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.

Web Title: Nine policemen took wickets on the leaves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.