उमरी गावातील निखिल मेश्राम ठरला प्रथम गुणवंत
By Admin | Updated: June 21, 2014 01:50 IST2014-06-21T01:50:12+5:302014-06-21T01:50:12+5:30
शिक्षणात इच्छाशक्ती व स्वबळावर यश मिळविणे सहज शक्य आहे.

उमरी गावातील निखिल मेश्राम ठरला प्रथम गुणवंत
सौंदड : शिक्षणात इच्छाशक्ती व स्वबळावर यश मिळविणे सहज शक्य आहे. ज्या गावात उच्चशिक्षणाचे धडे घेण्यासाठी शाळांची पाऊलवाटच नाही अशा लहान उमरी गावातील निखिल मेश्राम याने दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण घेवून गावात प्रथम गुणवंत होण्याचा मान मिळविला आहे.
उमरीपासून सात किलोमीटर अंतरावरील सौंदड येथील रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये गावातून प्राथमिक शिक्षण घेऊन वर्ग पाचवीपासून निखिल मेश्रामने प्रवेश घेतला. यानंतर गावातील प्राथमिक शिक्षणाप्रमाणे या शाळेत उच्चांक गाठण्यासाठी प्रयत्न केले.
उमरी हे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावात प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. गावात शेतकरी कुटुंबीयांची संख्या अधिक आहे. या लोकवस्तीतील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी गावात सोय नसल्याने शहरातील विद्यालयामध्ये दाखल होतात. शिक्षणातून भविष्याची उंच भरारी घेण्यासाठी गावातील प्रत्येक विद्यार्थी धडपड करीत आहेत. अभ्यासातील सातत्याने स्वत:ला उच्चांग गाठता यावा व यासाठी परिश्रमातून मार्ग निघतो, असा गावातील विद्यार्थ्यांसाठी निखिलने नवीन प्रवाह दिला आहे.
निखिलने परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून गुणवंत होण्याचा मान मिळविला, हे उमरी गावातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. सरपंच वनिता टेंभुर्णे व उपसरपंच हेमराज कापगते यांनी निखिलच्या यशाबद्दल कौतुक केले आहे. तसेच ‘गाव लहान पण किर्ती महान’ अशा प्रोत्साहनपर शब्दाने कर्तव्यदक्ष विद्यार्थ्याची पावती गावाला आता मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
निखिल मेश्रामने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व्ही. एफ. घनमारे, यु.बी. डोये, जे.एम.झाडे, के.के. कापगते, के.एस.काळे, डी.के. राऊत, संस्थेचे सचिव जगदिश लोहिया, प्राचार्य एम.एन. अग्रवाल व आपल्या आई-वडिलांना दिले. (वार्ताहर)