नवनिर्मित रस्त्याचे वाजविले बारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:20 IST2018-08-23T00:20:14+5:302018-08-23T00:20:48+5:30
शहरातील बाजार भागातील रस्ते व वीज वितरण कंपनीच्या अंडरग्राउंड केबलचे काम सोबतच सुरू करण्यात आले. अशात केबल टाकण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून नवनिर्मित रस्ते खोदले जात असल्याने अल्पावधीतच रस्त्यांची दूरवस्था होत आहे. दरम्यान वेळीच नगर परिषदेने दखल घेतल्याने हे काम थांबले.

नवनिर्मित रस्त्याचे वाजविले बारा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील बाजार भागातील रस्ते व वीज वितरण कंपनीच्या अंडरग्राउंड केबलचे काम सोबतच सुरू करण्यात आले. अशात केबल टाकण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून नवनिर्मित रस्ते खोदले जात असल्याने अल्पावधीतच रस्त्यांची दूरवस्था होत आहे. दरम्यान वेळीच नगर परिषदेने दखल घेतल्याने हे काम थांबले.
शहरातील बाजार भागातील गुंतागुंतीचे होत चाललेले सर्वीस वायरचे जाळे धोकादायक ठरत आहेत. कित्येकदा यातून शॉटसर्कीट होऊन धोका निर्माण झाला. ही बाब लक्षात घेत वीज वितरण कंपनीकडून आयपीडीएस योजनेंतर्गत बाजार भागात अंडरग्राऊंड केबल टाकले जाणार आहे.
सध्या नेहरू चौक ते दुर्गा चौक व गांधी प्रतिमा ते श्री टॉकीज चौकापर्यंतचे काम केले जाणार आहे. या कामांतर्गत वीज वितरण कंपनीने नव्याने तयार करण्यात आलेल्या नेहरू चौक रस्त्यावर खोदकाम करून केबल टाकले.
यासाठी वीज वितरण कंपनीकडून रस्त्याचा एक कोपरा फोडण्यात आला आहे. याची माहिती मिळताच नगर परिषद बांधकाम सभापती शकील मंसुरी यांनी हे काम थांबविले. तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना रस्ते न खोदता केबलचे काम करण्याचे व केलेल्या खोदकामाची दुरूस्ती करण्यासाठी भरपाई देण्याची मागणी केली. त्यानुसार, आता वीज वितरण कंपनीकडून रस्त्यांचे खोदकाम करण्याची गरज पडणार नसल्याची माहिती मिळाली. मात्र रस्त्यांच्याकडेला लावण्यात आलेले गट्टू काढून त्याखालून केबल टाकले जाणार आहे. यासाठी वीज वितरण कंपनीकडून सध्या गट्टू लावण्याचे काम करीत असलेल्या कंत्राटदाराकडूनच ते कामे केले जाणार असल्याचे मंसुरी यांनी सांगितले.