जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा नवा रेकार्ड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST2021-04-07T04:30:24+5:302021-04-07T04:30:24+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांचा नवा रेकार्ड स्थापन होत आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ...

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा नवा रेकार्ड !
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांचा नवा रेकार्ड स्थापन होत आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ३८० कोेरोनाबाधितांची नोंद झाली होती, तर यंदा मंगळवारी (दि.६) रोजी जिल्ह्यात सर्वाधिक ३९० रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, जिल्हावासीयांनी हे गांभीर्याने घेत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात मंगळवारी ३९० कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १०० बाधितांनी कोरोनावर मात केली. मंगळवारी आढळलेल्या ३९० रुग्णांमध्ये सर्वाधिक २६६ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. आमगाव २५, गोरेगाव २६, अर्जुनी मोरगाव १३, सडक अर्जुनी ११, देवरी ९, तिरोडा २९, सालेकसा ५ व बाहेरील राज्यातील ६ रुग्णांचा समावेश आहे. गोंदिया तालुक्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची वाढ होत असून, हा तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट होत आहे, तर गोंदिया शहरातील तीन भागात कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले. त्यामुळे गोंदिया शहर व तालुकावासीयांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे, अन्यथा कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,०९,०९३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले आहे. यापैकी ९४,९०६ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत ९३,९९१ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ८६,२४७ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १७,६४९ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी १५,५४५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. १,९२८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ५५३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
................
कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९१ टक्के
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने, कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९१ टक्केवर आला आहे, तर मृत्युदर १.१ टक्के आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध लावण्यासाठी मास्क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.