स्थानकांचे नव्याने विद्युतीकरण
By Admin | Updated: April 13, 2017 02:02 IST2017-04-13T02:02:09+5:302017-04-13T02:02:09+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या विद्युत विभागाद्वारे रेल्वे स्थानकांचे विद्युतीकरण व पॅसेंजर

स्थानकांचे नव्याने विद्युतीकरण
दोन नवीन वॉटर कुलर : एस्कलेटरचे काम प्रगतीपथावर
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या विद्युत विभागाद्वारे रेल्वे स्थानकांचे विद्युतीकरण व पॅसेंजर हॉल्टला पूर्णत: विद्युतीकरण करण्याचे काम सुरू आहे. तसेच गोंदिया-चंद्रपूर लोहमार्गावरही विद्युतीकरणाचे काम बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाला सन २०१६-१७ मध्ये ५० स्थानकांमध्ये १०० टक्के एलईडी फिटिंग करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. विद्युत विभागाद्वारे आतापर्यंत ६० स्थानकांमध्ये निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक एलईडी फिटिंगची व्यवस्था करण्यात आली.
तसेच नागपूर मंडळाच्या राजनांदगाव स्थानकात लिफ्टची स्थापना करून ती सुरू करण्यात आली आहे. गोंदिया स्थानकात लिफ्ट उभारण्याचे काम पूर्णत्वास जात आहे. लवकरच ही लिफ्ट प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. याशिवाय गोंदिया व राजनांदगाव स्थानकांवर एस्कलेटरचे (स्वयंचलित पायऱ्या) काम प्रगतीपथावर आहे.
सन २०१६-१७ मध्ये नागपूर मंडळाच्या चिचोली बुजुर्ग, अरूणनगर व मंडेला पॅसेंजर हॉल्टचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांना सुविधा मिळू शकेल. आवश्यक सुविधेअंतर्गत गोंदियात दोन नवीन वॉटर कुलर लावण्यात आले आहेत. वडसा, इतवारी, नागभीड, सालेकसा व डोंगरगड स्थानकांमध्ये सध्याचे वॉटर कुलर बदलवून नवीन वॉटर कुलर लावण्यात आले आहेत.
मंडळातील ३२ स्थानकांच्या प्रसाधनांमध्ये आवश्यकतेनुसार विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. मंडळातील ए, बी, डी, व ई श्रेणीच्या स्थानकांमध्ये एकूण ३३ विद्युतीय आधुनिक नामफलकांची तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)