ग्रामपंचायतची नवीन इमारत धुळखात
By Admin | Updated: January 2, 2017 00:49 IST2017-01-02T00:49:28+5:302017-01-02T00:49:28+5:30
शासनाच्या मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत सन २०१२-१३ मध्ये नवीन ग्रामपंचायत करिता सहा ते सात लाखांचा निधी

ग्रामपंचायतची नवीन इमारत धुळखात
सौंदड : शासनाच्या मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत सन २०१२-१३ मध्ये नवीन ग्रामपंचायत करिता सहा ते सात लाखांचा निधी बीआरजीएफच्या अंतर्गत देण्यात आला. मात्र २०१२-१३ मध्ये तयार झालेली इमारत चार वर्षापासून धुळखात पडल्याचे दिसून येत आहे. तर जीर्ण झालेल्या इमारतीमधील ग्रामपंचायतचे कारभार अजुनही त्याच ठिकाणावर चालू आहे.
शासनाने बीआरजीएफ अंतर्गत तयार केलेल्या इमारतीचा गेल्या चार वर्षापासून कुठल्याही प्रकारे उपयोग नसून शासनाच्या निधीचा गैरवापर करण्यात आला आहे. अशी चर्चा सर्वत्र गावकरी जनतेमध्ये आहे. सध्या वास्तव्यास असलेल्या ग्रामपंचायतमध्ये पावसाळ्यात ठिकठिकाणी छतातून पाणी गळते. तर इमारतीची लाकडे व भिंती जीर्ण अवस्थेत असल्याने वादळवाऱ्यामध्ये कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीर्ण इमारतीमध्ये ठिकठिकाणी छताला छिद्र पडल्याने सूर्य प्रकाश आतमध्ये फुटक्या कौलारुमधून शिरते. त्यामुळशे कर्मचाऱ्यांना या इमारतीमध्ये काम करण्यास भिती वाटते.
तालुक्यात लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे गाव असूनही जीर्ण ग्रामपंचायतीमध्येच कारभार चालत आहे. त्यामुळे नवीन इमारतीचे काय काम असाही प्रश्न केला जात आहे. तालुक्यामध्ये सर्वात जास्त योजना या ग्रामपंचायतीला येतात. परंतु निधीचा वापर योग्यरित्या व योग्यवेळी मिळत नसल्याने भोंगाळ कारभार दिसून येत आहे. तर जुन्या ग्रामपंचायतीच्या डागडुजी करिता १४ वित्त आयोगातील निधीतून जवळपास ३ लाख रुपये लावण्याचे बोलल्या जात आहे. परंतु नवीन धुळखात पडलेल्या इमारतीचे काय? याकडे अधिकारी बोलताना दिसून येत नाही.
नवीन इमारतीमध्ये ग्रामपंचायतीचे कारभार चालू करण्यात यावे व आलेल्या निधीचा योग्य ठिकाणी वापर करण्यात यावा, अन्यथा ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्यात येणार असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. करिता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जीर्ण झालेल्या इमारतीतील कामकाज नवीन इमारतीमध्ये चालू करण्याचे आदेश द्यावे अशी जनतेकडून मागणी होत आहे. (वार्ताहर)