देवरी : कोरोनामुळे राज्यातील स्थिती बिकट झाली असून आरोग्य सुविधांअभावी अनेकांचे जीव जात असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच निगेटिव्ह रुग्णाला पाॅझिटिव्ह दाखवून त्याची रवानगी कोविड केअर सेंटरला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
देवरी येथील परसटोला वॉर्डात राहणारे एका व्यक्तीने कोविड केअर सेंटरला १२ एप्रिलला तपासणी केली. अहवालाची विचारणा केल्यावर तीन दिवसांत येईल, असे सांगितले. त्यानंतर १६ एप्रिल रोजी कोविड केअर सेंटर देवरी येथून डॉ. अमोल पाटील यांचा भ्रमणध्वनीवर त्या व्यक्तीला फोन आला. सांगितले की, तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात. यावर रिपोर्टची मागणी केल्यावर माझ्याकडे पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट आहे पण तुम्हाला देऊ शकत नाही, असे म्हटले. याउपरही त्यांनी तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात, तुम्ही इकडे तिकडे दिसले तर तुमच्यावर मी स्वत: गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली. यावर सचिनने आपली रवानगी कोविड-१९ विलगीकरण कक्ष देवरी येथे केली. तिथेही रिपोर्टची मागणी केल्यावर देण्यात आली नाही. जवळपास दोन दिवस उपचार सुरू असताना त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे, म्हणून लगेच त्यांना सुटी देण्यात आली. या घटनाक्रमामुळे त्या व्यक्तीला मानसिक त्रासातून जावे लागले. परिणामी कोविड सेंटरमधून दिलेल्या औषधांच्या दुष्परिणामांच्या भीतीने ते खचून गेले आहेत. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीचे काका कोरोना बाधित असून त्यांच्यावर मात्र कसलाच उपचार करण्यात आला नाही. दरम्यान, या बेजबाबदार प्रकरणाची तक्रार संबंधित व्यक्तींने देवरी पोलिसात केली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार एकाच क्रमांकाचा मोबाईल क्रमांक दिल्यामुळे निर्माण झाल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाकडून देण्यात आले.
......
‘पॉझिटिव्ह रुग्णांची मला यादी प्राप्त झाली होती. यादीनुसार माझे काम पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना संपर्क करुन विलगीकरण व कोविड केंद्रात भरती करण्याचे आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या यादीत सदर निगेटिव्ह रुग्णांच्या यादीत सदर निगेटिव्ह रुग्णाचे नाव कसे आले, याची माहिती नाही.
डॉ. अमोल पाटील, देवरी.