वृक्ष लागवडीसाठी ग्रामस्थांच्या सहकार्याची गरज
By Admin | Updated: July 1, 2017 00:21 IST2017-07-01T00:21:22+5:302017-07-01T00:21:22+5:30
दिवसेंदिवस जंगलात वृक्षतोड होत असल्याने गावकऱ्यांनी या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाला सहकार्य करावे.

वृक्ष लागवडीसाठी ग्रामस्थांच्या सहकार्याची गरज
एस.एन. पंधरे : दोन हजारांवर रोपटी लावणार
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : दिवसेंदिवस जंगलात वृक्षतोड होत असल्याने गावकऱ्यांनी या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाला सहकार्य करावे. जंगल ही गावचीच संपत्ती आहे. जंगलामधील झाडांचे रक्षण करण्याची गावची जबाबदारी आहे. विविध उपयोगी वनस्पती व आल्हाददायक हवामान मानवाला जंगलापासून मिळते. गावकऱ्यांना रोजगारांची संधी जंगलापासून मिळते. जंगलाचे प्रमाण वाढावे व पोषक वातावरण निर्मितीसह प्रदूषणाला आळा बसण्यासाठी झाडे जगणे आवश्यक आहे. गावामध्ये निसर्गरम्य वातावरण निर्मितीसाठी गावकऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी पुढे यावे असे आवाहन क्षेत्र सहाय्यक एस.एन.पंधरे यांनी केले.
बोदरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात वृक्ष लागवडीसाठी पूर्व तयारी करण्याच्या आयोजित बैठकीप्रसंगी गावकऱ्यांना ते मार्गदर्शन करीत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयवंता झोळे होत्या. यावेळी वनरक्षक पी.टी. दहिवले, पो.पाटील यशवंत कापगते, नाशिक कापगते, वनसमितीचे अध्यक्ष भाष्कर कवरे, मनोज झोळे, पुरुषोत्तम बडोले, सोमा शहारे, सुखदेव राऊत, इस्तारी टेंभुर्णे, तेजराम झोळे, सतिश कावळे उपस्थित होते.
यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रभारी क्षेत्र सहायक पंधरे म्हणाले की, वृक्ष तोडीने मानवाला अनेक संकटांना पुढे जावे लागत आहे. झाडांची संख्या कमी झाल्याने पावसाचे प्रमाण कमी झालेले दिसत आहे. शुद्ध हवामानापासून मानव वंचित होत आहे. येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी गावकऱ्यांनी स्वत:हून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. बोदरा येथे लोकांच्या सहभागातून झुडपी जंगल गट नं. २३७/२ मधील २ हेक्टर क्षेत्रात विविध प्रजाती २ हजार २०० वृक्षांची लागवड १ जुलै रोजी करण्यात येणार आहे.
४ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत येत्या १ जुलैला बोदरा येथे गावकऱ्यांच्या सहभागातून वृक्षारोपण केले जाणार आहे. गावकऱ्यांनी सहभागी व्हावे असे वनरक्षक पी.टी. दहिवले यांनी बैठकीत आवर्जुन सांगितले. संचालन वनसमितीचे अध्यक्ष भाष्कर कवरे यांनी केले.