पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 00:25 IST2017-07-02T00:25:29+5:302017-07-02T00:25:29+5:30
कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडतो आहे. वातावरणातील ओझोन वायुचे प्रमाण कमी होत आहे.

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज
बडोले : धम्मकुटी येथे ४ कोटी रोपटी लावणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडतो आहे. वातावरणातील ओझोन वायुचे प्रमाण कमी होत आहे. अनेक विषारी किरणे पृथ्वीवर येत आहेत. उत्तर धृवावरचा बर्फ वितळताना दिसतो आहे. यासर्व घडामोडी पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे घडून येत आहे. बिघडलेल्या पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्ष लागवड आज काळाची गरज झाली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
शनिवारी (दि.१) सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा-पळसगाव जवळील सम्यक संकल्प धम्मकुटी येथे ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्हास्तरीय वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, उपवनसंरक्षक एस.युवराज, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी प्रदिपकुमार बडगे, भंते संघधातू, तहसीलदार विठ्ठल परळीकर, जैवविविधता समिती अध्यक्ष विलास चव्हाण, माजी जि.प.सदस्य किरण गावराणे, पं.स.सदस्य जोशीला जोशी, बाजार समतिीचे संचालक डॉ.भुमेश्वर पटले, पुष्पमाला बडोले, विठ्ठल साखरे, चेतन वडगाये उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी काळे यांनी, जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी १५ लाख खड्डे करण्यात आले आहे. टिश्यू कल्चरच्या माध्यमातून २ लाख पिवळ््या पळसाची रोपटी तयार करण्यात येतील. परदेशी वृक्षांची लागवड न करता केवळ देशी वृक्षांची लागवड राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून माहिती देतांना युवराज यांनी, जिल्ह्याला १२ लाख ३० हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात १५ लाख ९७ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ४०० रोपांची लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह अन्य मान्यवरांनी सम्यक संकल्प धम्मकुटीच्या परिसरात वृक्ष लागवड केली.