केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध
By Admin | Updated: July 26, 2015 02:05 IST2015-07-26T02:05:08+5:302015-07-26T02:05:08+5:30
प्रेम प्रकरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात, असा युक्तीवाद करुन देशाचे कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी आपण व आपला भारतीय जनता पक्ष ...

केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध
गोंदिया : प्रेम प्रकरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात, असा युक्तीवाद करुन देशाचे कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी आपण व आपला भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांच्याप्रति किती आश्वस्त आहे हे दाखवून आपल्या निर्लज्जपणाचे दर्शन देशाला घडविले आहे. कृषी मंत्री राधामोहन सिंह यांचे वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध करीत असून या देशातील जनतेसाठी संवेदनशील असलेल्या राधामोहनसिंह यांना कृषी मंत्री पदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही, अशा शब्दात जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा निषेध करीत असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून कळविले.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्यसभेत शेतकऱ्यांचे प्रश्नावर चर्चेत भाग घेताना भारत सरकारचे कृषी मंत्री राधामोहन सिंह हुड्डा यांनी या वर्षभरात १४०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून या आत्महत्या प्रेमप्रकरण, अपत्य न होणे, कौटुंबिक कलह या कारणामुळे झालेल्या आहेत असे बेजबाबदारपणाचे विधान करुन सर्वांनाच आश्चर्यात टाकले आहे.
या आत्महत्या प्रेमप्रकरणामुळे व कौटुंबिक कलहातून झाल्या असतील तर विरोधी बाकावर असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यात सरकार दोषी आहे. सरकारची कृषी निती दोषी आहे. म्हणून आत्महत्या होत आहेत, असे सांगून अनेकदा लोकसभा, राज्यसभा व राज्यात विधानसभा व विधानपरिषदेचे कामकाज दिवस-दिवस बंद पाडण्यात येत होते. तेव्हा प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या होतात हे त्यांना समजले नव्हते का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
त्यामुळे भाजपाचे देशातील व राज्यातील सरकार शेतकऱ्यांप्रति किती जागरुक आहे हे स्पष्ट होते. कृषी मंत्री राधामोहन सिंह हुड्डा यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध करीत असून त्यांना मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे परशुरामकर म्हणाले. (तालुका प्रतिनिधी)