रिक्त पदांसाठी राष्ट्रवादीचा मोर्चा
By Admin | Updated: February 5, 2016 01:16 IST2016-02-05T01:16:41+5:302016-02-05T01:16:41+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा आरोग्य प्रशासनाने आश्वासन देऊनही भरल्या नाही.

रिक्त पदांसाठी राष्ट्रवादीचा मोर्चा
रुग्णांची हेळसांड : केशोरी प्रा.आ.केंद्रातील प्रकार
केशोरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा आरोग्य प्रशासनाने आश्वासन देऊनही भरल्या नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष नामदेव डोंगरवार, युवा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष योगेश नाकाडे यांच्या नेतृत्वात गुरूवारी (दि.४) दुपारी प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक मोर्चा काढण्यात आला.
यासंदर्भात एक महिन्यापूर्वी तालुका आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य विभागाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देऊन रिक्त जागा त्वरीत भरण्याची विनंती केली होती. परंतु जि.प.आरोग्य प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे या भागातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. रुग्णांची हेळसांड दूर करण्यासाठी हा मोर्चा काढून लक्ष वेधण्यात आले.
मोर्चाची सुरूवात गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून करण्यात आली. केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागा त्वरित भरा, निष्क्रीय जिल्हा आरोग्य प्रशासन हाय-हाय अशा घोषणा देत हा मोर्चा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडकला. मोर्चाचे रुपांतर सभेत करण्यात आले. याप्रसंगी सुधीर साधवानी, जनार्धन काळसरपे, गोवर्धन पाटील ताराम, गजानन कोवे, अनिल मेहता, विकास रामटेके, संजय कांबळे, श्रीकांत घाटबांधे यांच्यासह जवळपास २०० च्यावर युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन गजानन कोवे यांनी तर आभार सरीता नंदेश्वर यांनी मानले. (वार्ताहर)
२४ तासांत पदे भरणार
मोर्चाला मार्गदर्शन करताना मनोहर चंद्रिकापुरे यांनी रुग्णांची कशी गैरसोय होते हे सांगितले. मोर्चाला समोरो जाण्यासाठी आरोग्य प्रशासनाने आपले प्रतिनिधी म्हणून शुक्ला आणि तालुका वैद्यकीय अधिकारी राऊत यांना पाठविले. येत्या २४ तासात काही महत्वाची रिक्त पदे भरण्याच्या लेखी शर्थीवर मोर्चा विसर्जीत करण्यात आला.