नायब तहसीलदार कार्यालय नावापुरतेच
By Admin | Updated: February 19, 2015 01:06 IST2015-02-19T01:06:58+5:302015-02-19T01:06:58+5:30
नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता आठ-दहा वर्षांपूर्वी तत्कालिन आ.सेवक वाघाये यांनी सौंदड येथे नायब तहसीलदार यांचे कार्यालय सुरू करण्यास भाग पाडले.

नायब तहसीलदार कार्यालय नावापुरतेच
सौंदड (रेल्वे) : नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता आठ-दहा वर्षांपूर्वी तत्कालिन आ.सेवक वाघाये यांनी सौंदड येथे नायब तहसीलदार यांचे कार्यालय सुरू करण्यास भाग पाडले. तेथील कारभार दोन-तीन वर्षे व्यवस्थित सुरू होता, मात्र आता नायब तहसीलदारांनीच कार्यालयात येणे बंद केल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सौंदड येथे नायब तहसीलदारांचे कार्यालय पूर्वी व्यवस्थित सुरू होते. नायब तहसीलदारही पूर्ण वेळ कार्यालयात उपस्थित राहत होते. त्यावेळी या कार्यालयांतर्गत १५ ते १६ गावांचा कारभार चालत असे. दहा-बारा प्रकारची महत्त्वाची महसुली कामेही या कार्यालयांतर्गत होत होती. नागरिकांची कामे पटकन व सोयीने होत असल्याने सौंदड मंडळांतर्गत येणाऱ्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने सौंदड कार्यालयातून आपले काम उरकून घेत असत.
या प्रकारामुळेमुळे तहसील कार्यालयात जाणारा लोंढा कमी झाला होता. लोंढा कमी झाल्याने त्या-त्या वेळच्या तहसीलदारांच्या अतिरीक्त आवकवरही परिणाम झाला व त्यांनी सौंदड येथील नायब तहसीलदारांचे एकेक अधिकार कमी करत गेले. शेवटी उत्पन्नाचे दाखले, प्रमाणपत्र व अशाच कनिष्ठ दर्जाच्या प्रमाणपत्रांवर सह्या करण्यापुरते अधिकार ठेवण्यात आले. त्यामुळे नायब तहसीलदार या कार्यालयात बसण्यास टाळाटाळ करू लागले. कधी यायचे तर कधी यायचेच नाही. शेवटी त्यांनी या कार्यालयात येणेच बंद केले. त्यांच्या हातून महत्त्वाच्या कामांचे अधिकार काढून घेतल्याने ते ही नाराज व उदासिन झाले होते. तेव्हापासून जवळपास आठ ते दहा वर्षापासून सौंदड येथे नायब तहसीलदार कार्यालय आहे, परंतु नायब तहसीलदाराच येत नाही. आता सौंदड मंडळातील नागरिकांना तहसीलच्या कामासाठी सडक-अर्जुनीला जावे लागते. यात नागरिकांचा वेळ व पैसा वाया जातो. त्यामुळे तहसीलदारांनी सौंदड येथील नायब तहसीलदार कार्यालय पूर्ववत सुरू करण्याची मागणी शिवसेना तालुका अध्यक्ष सदाशिव विठ्ठले व या कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची कार्यालयांना दांडी
सौंदड येथील तलाठ्यांनी सात-आठ दिवसांपूर्वी नव्याने पदभार सांभाळला. तेव्हापासून ते कार्यालयात हजर राहत नसल्यामुळे व मंडळ अधिकारी कोणतेही कारण सांगून तेसुद्धा आपल्या कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत. तलाठी व मंडळ अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही. वेळी-अवेळी कार्यालयात येतात. नागरिकांना वाट पाहत ताटकळत बसावे लागते. या दोन्ही तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची आठ दिवसात बदली करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुका शिवसेना प्रमुख सदाशिव विठ्ठले यांनी दिला आहे. तसेच नायब तहसीलदार कार्यालयात पूर्ण वेळ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची व्यवस्था लवकरात लवकर करण्याची मागणीही केली आहे.