नवेगावबांधचे पाणी बाराभाटीला पोहोचतच नाही
By Admin | Updated: February 26, 2015 01:00 IST2015-02-26T01:00:15+5:302015-02-26T01:00:47+5:30
उदरनिर्वाहासाठी नोकरी, धंद्यासोबतच शेती हा या परिसरातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे.

नवेगावबांधचे पाणी बाराभाटीला पोहोचतच नाही
बाराभाटी : उदरनिर्वाहासाठी नोकरी, धंद्यासोबतच शेती हा या परिसरातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे. परंतु शेती पिकविण्याकरिता उन्हाळ्यात मिळणारे नवेगावबांध तलावाचे पाणी बाराभाटी परिसरात पोहोचतच नाही. पाणी वाहून नेणारे कालवेच नादुरूस्त असल्यामुळे शेतीला पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.
गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. जिल्ह्यात गोठणगावबांध इटियाडोहप्रमाणे नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान हे नावारूपास आले आहेत. या तलावांच्या भरवशावर उन्हाळी धान पिकविला जातो.
या भात लागवडीसाठी दोन्ही तलावांच्यामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. म्हणजेच गोठणगाव इटियाडोह धरणाचे पाणी गोंदिया जिल्ह्यासोबत गडचिरोली जिल्ह्याचा काही भागातही पोहोचतो व शेती पिकविली जाते. त्याचबरोबर कडधान्य पिके, भाजीपाला अशाही पिकांचे उत्पादन घेतले जाते.
अर्जुनी-मोरगांव तालुक्यातील नवेगावबांध धरणाचे पाणी उन्हाळी शेतीसाठी सोडल्या जात असले तरी ते पाणी बाराभाटी, कुंभीटोला, पिंपळगाव खांबीपर्यंत पोहोचतच नाही, मग उन्हाळी शेती कशी पिकणार हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उभा होतो.
सदर नवेगावबांधचे पाणी कालव्यांव्दारे देवलगाव, येरंडीपर्यंत कसेतरी पोहचते. पण लहान कालव्यांना पाण्याचा थेंबही दिसत नाही. या प्रकाराची पाटबंधारे बांधकाम विभाग व पाणी पुरवठा समितीने तत्काळ दखल घेवून या समस्येचा पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.(वार्ताहर)