नैसर्गिक संकटाने अनेक गावातील शेतकरी हतबल
By Admin | Updated: November 22, 2014 00:47 IST2014-11-22T00:47:23+5:302014-11-22T00:47:23+5:30
गोंदिया हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर नोंद आहे. तसेच वनसंपत्तीने नटलेला जिल्हा म्हणून विशेष ओळख आहे.

नैसर्गिक संकटाने अनेक गावातील शेतकरी हतबल
केशोरी : गोंदिया हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर नोंद आहे. तसेच वनसंपत्तीने नटलेला जिल्हा म्हणून विशेष ओळख आहे. या जिल्ह्यातील उपेक्षित भाग म्हणून अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील आदिवासीबहुल असणारा केशोरी परिसर. या परिसरात सिंचनाची आणि औद्योगिक विकासाची वानवा असल्यामुळे या परिसरातील शेतकरी पूर्णत: धान पिकाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. परंतु वारंवार उद्भणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे येथील शेतकरी हतबल झाले आहेत.
नियतीच्या चक्रव्युहाने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाने छळले आहे. वेळोवेळी बदलणाऱ्या वातावरणामुळे बऱ्याच प्रमाणात धानपिकावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यावर मात करून शेतकऱ्यांनी धानाला लागलेल्या रोगावर नियंत्रण मिळविण्यास यश मिळविले. दिवाळीनंतर पावसाच्या सरी बरसल्याने काही शेतकऱ्यांची धान कापणी पाण्यात सापडली. अशा अनेक नैसर्गिक यातना केशोरी परिसरातील शेतकऱ्यांच्या नशिबी आल्या आहेत. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले तरी शेतकऱ्यांनी आपले धानपीक कसेबसे जगवले. त्यानंतर तुडतुडा, करपा, खोडकिडा यासारखे रोग आले. धानाच्या रोगांवर महागडी औषधी फवारून नियंत्रण ठेवण्यात यश आले, तरी पाहिजे त्या प्रमाणात धानपिकाच्या उत्पन्नाचा उतारा मिळत नसल्याने शेतकरीवर्ग विवंचनेत सापडल्याचे दिसून येत आहे.
या प्रकारामुळे दुर्दैवी शेतकऱ्यांनी निसर्गासमोर हात टेकले आहेत. या परिसरातील जांभळी, उमरपायली, डोंगरगाव, आंभोरा, बारव्हा, गवर्रा, गार्डनपूर, परसटोला, अरसतोंडी, धमदीटोला, इळदा, राजोली, भरनोली, खडकी, कन्हाळगाव या गावातील शेतकऱ्यांची धानपिके सिंचनाअभावी करपली जातात. या प्रकरणांची या परिसरातील नुकसानीची दाहकता व वास्तव प्रसारमाध्यमे सतत शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु या उपेक्षित भागाकडे आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधींचे मुळीच लक्ष नाही. त्यामुळेच या परिसरातील शेतकरी आपल्या नशिबाचे भोग भोगत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)