राष्ट्राभिमान हेच शिक्षणाचे ध्येय!

By Admin | Updated: March 12, 2017 00:19 IST2017-03-12T00:19:28+5:302017-03-12T00:19:28+5:30

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, शारीरिक, बौद्धिक व सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी शिक्षण क्षेत्रात नाना प्रयोग केले जात आहेत.

Nationalism is the goal of education! | राष्ट्राभिमान हेच शिक्षणाचे ध्येय!

राष्ट्राभिमान हेच शिक्षणाचे ध्येय!

यशवंत कावळे : गोरेगाव तालुकास्तरीय कब-बुलबुल मेळाव्याची सांगता
मोहगाव (तिल्ली) : विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, शारीरिक, बौद्धिक व सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी शिक्षण क्षेत्रात नाना प्रयोग केले जात आहेत. याच बरोबर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून त्यांना संशोधक दृष्टी देण्याची मोलाची जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर आहे. शिक्षणाच्याच माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कणखरपणा, लढावू वृत्ती, क्रिडा कौशल्य जोपासून त्यांना राष्ट्रासाठी निर्माण करणे व त्यांच्यात प्रखर राष्ट्राभिमान आणणे हेच शिक्षणाचे अंतिम ध्येय असल्याचे प्रतिपादन गोरेगाव पंचायत समितीचे गोरेगावचे गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे यांनी केले.
समूह साधन केंद्र मोहगाव (ति.) येथे तालुकास्तरीय कब-बुलबूल मेळाव्याच्या सांगता समारंभात बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मोहगावच्या उपसरपंच माया भगत, उद्घाटक पं.स. सदस्य ललीता बहेकार, तर अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी डी.एम. मालाधारी, केंद्र प्रमुख आर.आर. अगडे, मुख्याध्यापक बी.सी. वाघमारे, रामेश्वर बोपचे तसेच मार्गदर्शक म्हणून गोंदिया भारत स्काऊट गाईडस्चे जिल्हा आयुक्त व्ही.आर. भगत, चिटणीस जी.एस. चिंधालोरे, ए.डी.सी. एम.डब्ल्यू. नंदनवार उपस्थित होते.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केंद्रात कार्यरत महिला शिक्षिका एल.के. ठाकरे, के.आर. भोयर, गजभिये यांचा पुष्प देवून सन्मान करण्यात आला. शिक्षण विस्तार अधिकारी मालाधारी यांनी कब बुलबुलमुळे विद्यार्थ्यांत स्त्री-पुरुष समानता, आदरभाव, कर्तव्य, देशप्रेम ही मुल्ये रुजतात असे म्हटले.
केंद्रप्रमुख आर. आर. अगडे यांनी केंद्राच्या प्रगतीविषयी, कार्यान्वित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देवून, सदर मेळावा घेण्यासाठी शिक्षण विभाग गोंदियाने संधी उपलब्ध करुन अवघड क्षेत्राचे कार्य प्रकाशात आणल्याने कृतज्ञता व्यक्त केली. मुख्याध्यापक वाघमारे यांनी अशा नानाविध उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शाळांना निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सदर मेळाव्यात केंद्रातील मोहगाव (ति.), तेलनखेडी, तानुटोला, पिपरटोला, निंबा, चांगोटोला, गौरीटोला, पलखेडा, नवाटोला, महाजनटोला व नरसिंह तिल्ली या शाळांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्काऊट गोंदियाचे सुभाष तपासे, सोनल खोत, प्रणव गंगाखेडकर यांनी मेहनत घेतली. प्रास्ताविक एम.डब्ल्यू. नंदनवार यांनी, संचालन पदवीधर शिक्षक अशोक चेपटे व सुभाष तपासे यांनी संयुक्तपणे केले. चांगल्या कार्यक्रमासाठी केंद्र शाळा मोहगावला सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.आर. अगडे, बी.सी. वाघमारे, ए.आर. चेपटे, एस.एच. मेश्राम, एल.के. ठाकरे, एच.के. धपाडे, टी.पी. डावकरे, ए.एन. मेश्राम, डी.सी. कोल्हे, विजया शिकारे, गुणवंता कटरे व केंद्रातील शिक्षकांनी मेहनत घेतली. आभार आयुक्त व्ही.आर. भगत यांनी मानले. (वार्ताहर)

विविध स्पर्धा व विजेत्यांचा गौरव
यादरम्यान केंद्रांतर्गत येणाऱ्या वर्ग ३ व ४ च्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला, स्मरणशक्ती, प्रश्नमंजुषा, सांस्कृतिक कार्यक्रम, १०० मिटर दौड, पथनाट्य, कलादालन असे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपदक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
 

Web Title: Nationalism is the goal of education!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.