नॅनो कारसह देशी दारूचा साठा जप्त
By Admin | Updated: July 28, 2015 02:46 IST2015-07-28T02:46:30+5:302015-07-28T02:46:30+5:30
ग्रामपंचायत निवडणूक आणि नंतर विजयाच्या जल्लोषासाठी जिल्ह्यात अवैधपणे दारूची वाहतूक झाली. अशाच एका

नॅनो कारसह देशी दारूचा साठा जप्त
गस्तीदरम्यान नाकाबंदी : राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम
गोंदिया : ग्रामपंचायत निवडणूक आणि नंतर विजयाच्या जल्लोषासाठी जिल्ह्यात अवैधपणे दारूची वाहतूक झाली. अशाच एका नॅनो कारला दि.२६ रोजी पहाटे ३ वाजता गस्त घालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोरेगाव तालुक्यातील मौजा मेघाटोला येथील सिलेगाव फाट्याजवळ अडवून कारसह त्यातील दारू जप्त केली.
त्या झडती घेतली असता साडेदहा पेट्या देशी दारू अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. वाहन चालक राजेश गणेशलाल जैस्वाल व प्रविण देवराव टेंभुर्णीकर दोन्ही राहणार गोरेगाव यांना जागीच अटक करुन त्याच्याविरोधात दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) व ६५ (ई) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्यात देशी दारू फिरकी संत्राच्या १८० मिली क्षमतेच्या ५०४ बाटल्या व टाटा नॅनो कार असा ६२,९६२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही आरोपींची सखोल चौकशी केली असता सदर देशी मद्य साठा गोरेगाव येथील आर.ओ. कावळे व आर.आर. कावळे यांच्या भागीदारीतील देशी दारू दुकानातून तेथील अधिकृत नोकरनामाधारक पुरुषोत्तम दिवाकर चौरे यांचेकडून खरेदी केल्याचे वाहन चालक राजेश जैस्वाल याने सांगितले. तसेच दुकानाच्या समोरील गल्लीत देशी दारूच्या १८० मिलीच्या ३० पेट्या, ९० मिलीच्या १ पटी व बीअरची १ पेटी असा दारूसाठा विक्रीच्या उद्देशाने ठेवला असल्याचे दिसून आले व हा साठा विभागाने जप्त केलेला आहे.
देशी दारू दुकानाचे सखोल निरीक्षण करुन अवैधरित्या देशी दारूची विक्री केल्याप्रकरणी नियमभंगाचे प्रकरण नोंदवण्यात आले. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वात दुय्यम निरीक्षक देवरी १ चिटमटवार, दुय्यम निरीक्षक गोंदिया शहर निकुंभ, जवान पागोटे, उके, फुंडे व वाहनचालक मडावी यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी )
आतापर्यंत ४६ आरोपींना अटक
४गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात राज्य उत्पादन शुल्क गोंदिया विभागाकडून अवैध हातभट्या, मोहा दारू विक्रेते व देशी दारूची विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर धाडी टाकण्यात येत आहेत. जुलै महिन्यात विभागाकडून आतापर्यंत एकून ६९ गुन्हे नोंदवण्यात आले असून ४४ वारस गुन्ह्यांमध्ये ४६ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच ५३८ लिटर हातभट्टी मोहा दारू ३३२१० लिटर मोहा सडवा, २५४ लिटर देशी दारू व १ मोटरसायकल व एक टाटा नॅनो कार असा एकूण ९.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.