तलाठी कार्यालय नावापुरतेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 21:00 IST2018-10-20T20:59:56+5:302018-10-20T21:00:34+5:30
महसूल विभागाच्यावतीने १ नोव्हेंबर २०१७ मध्ये भरनोली तलाठी कार्यालयाचे विभाजन करुन राजोली येथे नवीन तलाठी कार्यालय सुरू केले. तहसीलदारांमार्फत १५ डिसेंबर २०१७ या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

तलाठी कार्यालय नावापुरतेच
लोकमत न्यूज नेटवर्क
राजोली : महसूल विभागाच्यावतीने १ नोव्हेंबर २०१७ मध्ये भरनोली तलाठी कार्यालयाचे विभाजन करुन राजोली येथे नवीन तलाठी कार्यालय सुरू केले. तहसीलदारांमार्फत १५ डिसेंबर २०१७ या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र १० महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर सुद्धा साजा क्रमांक ३४ राजोली करीता तलाठी नियुक्त करण्यात आला नाही. त्यामुळे येथील तलाठी कार्यालय फक्त नावापुरतेच असून येथे त्वरित तलाठ्याची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या डोंगराळ नक्षलग्रस्त, दुर्गम परिसरातील मौजा भरनोली या ठिकाणी ७ महसूल गाव व ८ पाडे मिळून मात्र एक तलाठी कार्यालय अस्तित्वात आहे. तलाठी कार्यालय भरनोलीच्या (त.सां.क्र.२५) कार्यक्षेत्रात तिरखुरी, भरनोली, राजोली, खडकी, सायगाव, कन्हाळगाव, तुकुम, कान्हाटोली इत्यादी गावांचा समावेश होता. तलाठी कार्यालय भरनोलीपासून कन्हाळगाव ५ किमी, सायगाव ४ किमी, तुकुम ४ किमी, नवीनटोला ३ किमी अंतरावर आहे. ७/१२, नमूना-८ सारख्या महत्वपूर्ण उताऱ्यासाठी नागरिकांना ४-५ किमी ये-जा करावी लागते.
ही बाब लक्षात घेत मौजा राजोली येथे स्वतंत्र तलाठी कार्यालय स्थापन करण्यात आले. मात्र स्वतंत्र तलाठी नियुक्त करण्यात आला नाही व कार्यालय सुद्धा कार्यान्वीत करण्यात आले नाही. त्यामुळे तलाठी कार्यालय नावापुरतेच उघडले की काय? अशी चर्चा नागरिकांत रंगत आहे. महसूल विभागाच्या या कामामुळे मात्र नागरिकांची फरफट होते.
त्यामुळे स्वतंत्र तलाठी नियुक्त करुन कार्यालय सुरु करावे अशी मागणी गोवर्धन पाटील ताराम, नामदेव लांजेवार, लालाजी गायकवाड, दिनेश इंदूरकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.