विदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली १५२ युवकांना गंडविले
By Admin | Updated: October 30, 2015 01:54 IST2015-10-30T01:54:43+5:302015-10-30T01:54:43+5:30
दुबई व कुवैतमध्ये नोकरी लावून देण्यासाठी पारपत्र बनवून देण्याच्या नावाखाली सुमारे १५० हून अधिक युवकांना गंडविले.

विदेशात नोकरी देण्याच्या नावाखाली १५२ युवकांना गंडविले
वडेगाव : दुबई व कुवैतमध्ये नोकरी लावून देण्यासाठी पारपत्र बनवून देण्याच्या नावाखाली सुमारे १५० हून अधिक युवकांना गंडविले. ही घटना गुरूवारी (दि.२९) तिरोडा तालुक्यातील वडेगाव परिसरात उघडकीस आली. या प्रकरणातील ढकबाज आरोपी सुमारे ८० लाख रकमेसह बेपत्ता झाले आहेत.
सदर घटनेतील ढकबाज आरोपींमध्ये राजकुमार सुकुल साहनी (३४) रा.भटनी जि. देवरीया (उत्तरप्रदेश) व दुसरा आरोपी अरूण वीरेंद्रकुमार सिंग हे आहेत. यासंदर्भात ढगवल्या गेलेल्या युवकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मागील सुमारे चार महिन्यांपासून वडेगाव परिसरातील कोडेलोहारानंतर तिरोडा व त्यानंतर विर्सी येथील एका हॉटेलमध्ये खोेली करून राहात होते.
दुबई व कुवैत या देशात नोकरी लावून देणे व विदेशाकरीता पारपत्र (व्हिसा) बनवून देण्यासाठी या आरोपींनी विविध गावच्या युवकांकडून प्रत्येकी ४०-५० हजार रुपये उकळले. नवख्या युवकांकडून ४५ हजार तर पूर्वी विदेशात जाऊन आले त्यांच्याकडून ४० हजार रुपये व मेडीकलचे चार हजार रुपये असे प्रत्येकाकडून ५० हजार रुपये उकळले. यातून त्याने बोगस पारपत्र, बोगस करारपत्र व बोगस विमान तिकीट तयार केली. एवढेच नव्हे तर मुंबईत सीएसटी येथे ई-ट्रस्ट नावाचे बोगस आॅफीसही दाखविले.
निवड केलेल्या बेरोजगार युवकांना २७, २८ व २९ आॅक्टोबर अशा तीन टप्यात विदेशात जाण्यासाठी बोगस विमान व जेट एअरवेज, एअर इंडिया विमानाची बोगस तिकीटे पुरविण्यात आली. युवकांना नियोजित दिवशी मुंबई विमानतळावर पोहचण्यास सांगितले. स्वत: मात्र विमानाने मूळ पासपोर्टसह मुंबईला पोहचणार असल्याचे सांगितले.
दि. २७ व २८/१०/१५ रोजी युवक विमानतळावर पोहचल्यावर सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर काहीनी पोलीस स्टेशन ठाणा व काहीनी पोलीस स्टेशन तिरोडा येथे तक्रार दाखल केली आहे. आरोपी विरूध्द तिरोडा पोलिसांनी भादंवि कलम ४२०/३४ अन्वये एफआयआर व १५१ दाखल केला आहे.
पुढील तपास ठाणेदार देवीदास ईलमकर यांचे मार्गदर्शनाखाली पीआय देशमुख, इंगळे, कांबळे, बचेरे करीत असून पोलीस चमू तपासासाठी रवाना झालेली आहे.
ढगलेल्या युवकांमध्ये माल्ही येथील १९, बोरगाव १२, वडेगाव ९, सातोना १०, बोपेसर ७, भजेपार ७, सर्रा १, कोडेलोहारा ५, सुकडी ६, गुमाधावडा १२, कवलेवाडा ८, बेलाटी खु. ७, डोंगरला २, बिनाकी २, मारेगाव ६, कोयलारी ११ सह इतर गावातील अनेक युवकांचा समावेश आहे. सदर संख्या २०० च्या पुढे असण्याची शक्यता आहे.