दवनीवाडा सेवा सहकारी संस्थेत बँक प्रतिनिधीच्या नावात घोळ
By Admin | Updated: June 19, 2016 01:38 IST2016-06-19T01:38:26+5:302016-06-19T01:38:26+5:30
विविध सेवा सहकारी संस्था दवनीवाडा र.नं.२५० च्या संचालक मंडळाच्या बैठकीत विषय क्र.३नुसार सभेत बँक प्रतिनिधी विषयावर चर्चा करण्यात आली.

दवनीवाडा सेवा सहकारी संस्थेत बँक प्रतिनिधीच्या नावात घोळ
नियमाला डावलले : अध्यक्ष व सचिवाने केला पदाचा दुरुपयोग
परसवाडा : विविध सेवा सहकारी संस्था दवनीवाडा र.नं.२५० च्या संचालक मंडळाच्या बैठकीत विषय क्र.३नुसार सभेत बँक प्रतिनिधी विषयावर चर्चा करण्यात आली. दवनीवाडा सेवा सहकारी संस्थेत बँक प्रतिनिधीच्या नावात घोळ केल्याचा आरोप चर्चेत भाग घेतलेले
सदस्य राजेंद्रसिंह मडले व इतर सहा सदस्यांनी आक्षेप घेतला आहे.
बँक प्रतिनिधी सहकारी कायदा अधिनियम १० (२) अन्वये, संचालक मंडळाने शेतकरी सभासदातून व वार्षिक सभेच्या ठरावानुसार प्रतिनिधीचे नाव सहकारी उपनिबंधक यांच्याकडे पाठवावे असे नियम असताना अध्यक्ष-सचिव यांनी साठगाठ करुन बँकेचे वर्तमान संचालक घनशाम द्वारकाप्रसाद मस्करे यांचे नाव मासिक सभेच्या इतीवृत्तावर घेवून आपल्या मर्जीने लिहून पाठविले. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप सात सदस्य गावातील शेतकरी वर्गाने केला आहे. यात भैयालाल सूर्यवंशी यांनी संजय मुन्ना चौधरी यांचे नाव सुचविले असता त्यांच्या नावाची अध्यक्ष, सचिव यांनी दखल घेतली नाही. परिणामी सभेत गदारोळ झाला. अध्यक्ष व सचिवाने धनाढ्यांच्या दबावाखाली येऊन काम केले. अशाच बँक प्रतिनिधीच्या नावाबद्दल प्रत्येक ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात सेवा संस्थेत गैरप्रकार झाला. हा मुद्दा वार्षिक सभेत न घेता मासिक सभेत घेऊन प्रतिनिधीचे नाव पाठविले. सदर ठराव रद्द करण्याची मागणी जिल्हा निबंधक, तालुका निबंधक यांच्याकडे केली आहे. वार्षिक सभेचा अहवाल विषय सूचीनुसार असलेल्या ठरावाला शिक्का मोर्तब करावे अशी मागणी राजेंद्रसिंह मडले, संजय मुन्नालाल चौधरी व सदस्यांनी केली आहे. तसे न केल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)