नगर पंचायतींचा बिगूल वाजला

By Admin | Updated: September 30, 2015 05:18 IST2015-09-30T05:18:42+5:302015-09-30T05:18:42+5:30

जिल्ह्यातील सालेकसा, सडक-अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव व देवरी या नव्याने अस्तित्वात आलेल्या पाच नगर

Nagar Panchayats have a big bang | नगर पंचायतींचा बिगूल वाजला

नगर पंचायतींचा बिगूल वाजला

गोंदिया : जिल्ह्यातील सालेकसा, सडक-अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव व देवरी या नव्याने अस्तित्वात आलेल्या पाच नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. सोबतच या नगर पंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्याच होत असलेल्या या निवडणुकीबाबत औत्सुक्याचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे नगर परिषदेप्रमाणे ही निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढविली जाणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आपले कोण उमेदवार उभे करायचे हे ठरविण्यापासून तर नगर पंचायतीवर आपले वर्चस्व कसे प्रस्थापित होईल यासाठी गेल्या काही दिवसांपासून कामी लागले आहेत. आता निवडणूक जाहीर झाल्यामुळे या कामाला आणखी वेग येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केल्यानुसार सालेकसा, सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगाव, गोरेगाव व देवरी या नगर पंचायत क्षेत्रात दि.२८ च्या मध्यरात्री १२ वाजतापासून निवडणूक आचासंहिता लागू करण्यात आली आहे.
सर्व नगर पंचायतीचे प्रशासक तथा तहसीलदार यांनी आचासंहितेचे पालन काटेकोरपणे होईल याची दक्षता घ्यावी, तसेच आचारसंहितेबाबत तरतूदीचे सर्वतोपरी पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

निवडणुकीची वैशिष्ट्ये
पक्षीय चिन्हांवर उमेदवार निवडणूक लढणार. त्यामुळे राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार.
प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा दिड लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
नगर पंचायतींमध्ये ५० टक्के महिला आरक्षण राहणार आहे. त्यामुळे महिला उमेदवारांना तयार करताना पक्षांचा कस लागणार आहे.
दि.२८ ला मध्यरात्री आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे दि.२९ पासून दि.१ नोव्हेंबरपर्यंत अवघ्या ३३ दिवसांच्या कालावधीत सर्व खेळ करावा लागणार आहे.

आमगावची निवडणूक न्यायालयाच्या निकालानंतर
आमगाव नगर पंचायतीवर काही स्थानिक लोकांनी आक्षेप घेतला आहे. आमगावला नगर पंचायत नको तर नगर परिषदेचा दर्जा द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. लगतच्या रिसामा बनगाव, पदमपूरला त्यात समाविष्ठ करून नगर परिषद बनवा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने नगर पंचायतीच्या अध्यादेशावर स्थगनादेश देऊन न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत पुढील प्रक्रिया न करण्याचा आदेश दिला आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
२९ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. १ ते ८ आॅक्टोबरपर्यंत नामनिर्देशपत्रे वाटप करून ते स्विकारले जातील. २ व ४ आॅक्टोबर या सुटीच्या दिवशी सोडून इतर दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशनपत्र देण्यात व स्विकारली जातील. ९ आॅक्टोबरला नामनिर्देशनपत्रांची छानणी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. १९ आॅक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणूक चिन्ह देऊन अंतिमरित्या निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. २६ आॅक्टोबरला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होणार असून १ नोव्हेंबरला सकाळी ७.३० पासून ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे. २ नोव्हेंबरला सकाळी १० वाजतापासून मतमोजणी सुरू होईल.

Web Title: Nagar Panchayats have a big bang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.