नगर पंचायतींचा रणसंग्राम सुरू

By Admin | Updated: October 2, 2015 06:20 IST2015-10-02T06:20:31+5:302015-10-02T06:20:31+5:30

जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, सडक-अर्जुनी, गोरेगाव व देवरी या चार नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी

Nagar Panchayatan Ranjhram | नगर पंचायतींचा रणसंग्राम सुरू

नगर पंचायतींचा रणसंग्राम सुरू

गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, सडक-अर्जुनी, गोरेगाव व देवरी या चार नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे. उमेदवारांना आॅनलाईन नामांकन भरण्यासाठी गुरूवार ते गुरूवार (दि.१ ते ८) अशी आठ दिवसांचा वेळ आहे. मात्र पहिल्या दिवशी या प्रक्रियेची पुरेसी माहिती नसल्यामुळे कोणाचे नामांकन आले नसल्याचे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले. त्यातच काही राजकीय पक्षांकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेले नाही. मात्र दोन ते तीन दिवसात बहुतांश उमेदवारांची तिकीट निश्चित होऊन नामांकन दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, येत्या १ नोव्हेंबरला नवनिर्मिती ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. मात्र आमगाव नगर पंचायतबाबत आधीच उच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे तेथील निवडणूक घेतली जात नाही. त्यात आता सालेकसा नगर पंचायतीवरही आक्षेप घेत उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केल्याने तेथील निवडणुकीवरही न्यायालयाने गुरूवारी स्थगनादेश दिला. त्यामुळे आता निवडणूक रणसंग्रामात केवळ चार नगर पंचायती उरल्या आहेत.
ही निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढविली जाणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष नगर पंचायतींवर कब्जा करण्यासाठी सरसावले आहेत. लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या निवडणुकीत बरेच चित्र बदलले. त्यामुळे कुठे कोणाची शक्ती वाढली आणि कोण कमजोर झाले याचे आराखडे बांधले जात आहेत. त्यातच पक्षाची प्रतिष्ठा पणाला लावत योग्य उमेदवारांची निवड व्हावी यासाठी राजकीय पक्षांचे नेतेमंडळी उमेदवारांची चाचपणी करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

११ दिवस मिळणार प्रचाराला
उमेदवारांना नामनिर्देशपत्रे आॅनलाईन भरावे लागणार आहे. १ ते ८ आॅक्टोबरपर्यंत त्याची मुदत आहे. ९ आॅक्टोबरला नामनिर्देशनपत्रांची छानणी होणार आहे. १९ आॅक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणूक चिन्ह देऊन अंतिमरित्या निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे दि.२० पासून ३० च्या सायंकाळपर्यत म्हणजे प्रचारासाठी जेमतेम फक्त ११ दिवस मिळणार आहेत. या काळात नेत्यांच्या सभा आणि प्रचाराचा धुराळा अत्युच्च शिखरावर राहणार आहे.

तहसीलदारांना अखेर मिळाले आयडी व पासवर्ड
या निवडणुकीसाठी संबंधित तालुक्यांचे तहसीलदार हे निवडणूक अधिकारी आहेत. निवडणूक आयोगाकडे आॅनलाईन कोणतीही माहिती पाठविण्यासाठी तहसीलदारांना विशिष्ट युजर आयडी आणि पासवर्ड पुरविण्यात येतात. मात्र गुरूवारी नामांकन दाखल करण्याचा पहिला दिवस असताना सुद्धा सायंकाळपर्यंत तहसीलदारांना त्यांचे युजर आयडी आणि पासवर्ड मिळाले नव्हते. त्यामुळे ही प्रक्रियाच खोळंबली होती. अखेर सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सर्व संबंधित तहसीलदारांना निवडणूक आयोगाकडे आयडी आणि पासवर्ड मिळाले.

Web Title: Nagar Panchayatan Ranjhram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.